हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी प्रस्ताव अन्‌ हवाय स्वतंत्र अधिकारी

रमाकांत घोडराज
Saturday, 7 November 2020

हद्दवाढीने महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या वलवाडी, मोराणे, महिंदळे, अवधान, चितोड, पिंप्री, भोकर, बाळापूर, वरखेडी, नकाणे आदी भागातील समस्यांप्रश्‍नी आमदार पाटील यांनी महापालिकेत अधिकाऱयांची बैठक घेतली.

धुळे  : हद्दवाढीने महापालिका क्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये रस्ते, पथदिवे, गटारी, स्वच्छता, पाणी आदी सर्वच मूलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याची कैफियत घेऊन धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील आज महापालिकेत पोहोचले. आयुक्तांसह अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. हद्दवाढ क्षेत्रातील दहाही गावांच्या समस्या सोडविण्यासाठी, विकासासाठी प्रस्ताव तयार करावा, नियोजन करावे, स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशा सूचना आमदार पाटील यांनी मनपा प्रशासनाला दिल्या. या क्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले. 
 
हद्दवाढीने महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेल्या वलवाडी, मोराणे, महिंदळे, अवधान, चितोड, पिंप्री, भोकर, बाळापूर, वरखेडी, नकाणे आदी भागातील समस्यांप्रश्‍नी आमदार पाटील यांनी आज (ता.६) दुपारी तीनला महापालिकेत अधिकाऱयांची बैठक घेतली. आयुक्त अजिज शेख, विरोधीपक्ष नेते साबीर शेठ, उपायुक्त शांताराम गोसावी, साहाय्यक आयुक्त विनायक कोते, साहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, अभियंता कैलास शिंदे, वलवाडीचे माजी सरपंच भटू चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य छोटू चौधरी, शिरीष सोनवणे, बापू खैरनार, महिंदळेचे माजी सरपंच दिनेश पाटील, वरखेडीचे माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्‍वर मराठे, वलवाडीचे माजी उपसरपंच जगदिश चव्हाण, ऋषी ठाकरे, खंडू पाटील, चुनिलाल पाटील, प्रा. विजय देसले, विजय वाघ, माजी नगरसेवक मुझ्झफर हुसैन, शब्बीर पिंजारी, अमीर पठाण, असिफ मोमीन आदी उपस्थित होते. 

समस्यांचा पाढा 
साधारण सर्वच हद्दवाढ क्षेत्रातील समस्यांचा पाढा त्या-त्या भागातील प्रतिनिधींनी वाचला. आयुक्त शेख यांनी हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासाठी साडेतीनशे कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केल्याचे सांगितले. त्यावर आमदार पाटील यांनी या प्रस्तावाबाबत सविस्तर माहिती द्या, निधी आणण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरवा करतो असे सांगितले. अवधान व पिंप्री गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी डेडरगाव तलावावरुन स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार करुन शासनाला सादर करण्याचीही सुचनाही त्यांनी केली. 

कर आकारणी, कर्मचाऱयांचा प्रश्‍न 
हद्दवाढ क्षेत्रात दहा वर्षापर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे कर आकारणी करावी अशी मागणी महिंदळेचे माजी सरपंच दिनेश पाटील यांनी केली. त्यावर तोडगा काढण्याच्याही सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. तत्कालीन ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या ७६ कर्मचाऱ्यांचा प्रश्ही‍न तातडीने मार्गी लावावा अशी सूचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. आ.कुणाल पाटील यांनी दिल्या. आयुक्त शेख यांनी हद्दवाढ क्षेत्राच्या विकासासह मूलभूत सोयी पुरविण्याबाबत आश्‍वासन दिले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation review mla kunal patil and special officer demand