अरेरे..लाखो रुपये मोजूनही ‘लाचारी’च! 

रमाकांत घोडराज
Friday, 15 January 2021

वॉटरग्रेसचे काम योग्य नसल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार होते. मात्र, कंपनीने कार्यमुक्त मागितल्याने काळ्या यादीत टाकले नाही.

धुळे : शहरातील कचरा संकलनाच्या जांगडगुत्त्याने शुक्रवारी (ता. १४) स्थायी समिती सभापतींसह सदस्यही चक्रावून गेले. रिलाएबल एजन्सीने कामास अचानक नकार कसा दिला, या प्रश्‍नाभोवती संशयकल्लोळ उभा राहिला. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उद्याच समस्या सुटेल, अशा आविर्भावात भाषण ठोकून वेळ निभावून नेली. शेवटी कचरा संकलनाची मदार तूर्त वॉटरग्रेसवरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. अर्थात लाखो रुपये मोजून लाचारीच अशी महापालिकेची अवस्था झाली आहे. 
महापालिकेच्या स्थायी समितीची शुक्रवारी सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात साप्ताहिक सभा झाली. सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त शांताराम गोसावी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. सभेत शहरातील कचरा संकलनाची समस्या व त्याअनुषंगाने ठेकेदार नियुक्तीच्या प्रश्नावरून जोरदार चर्चा झाली. रिलाएबल एजन्सीने अचानक नकार कसा दिला, असा प्रश्‍न खुद्द सभापती बैसाणे यांनी प्रशासनाला विचारला. सदस्य युवराज पाटील म्हणाले, की प्रभागातील नागरिक आता आमच्या दारापुढे कचरा टाकतात, आम्ही काय करायचे? सदस्य अमोल मासुळे म्हणाले, की वॉटरग्रेसचे काम योग्य नसल्याने त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार होते. मात्र, कंपनीने कार्यमुक्त मागितल्याने काळ्या यादीत टाकले नाही. रिलाएबल एजन्सीने नकार का दिला, प्रशासन वॉटरग्रेसला पाठीशी घालत आहे का, असे प्रश्‍न त्यांनी उपस्थित केले, तर वॉटरग्रेसवर कारवाई न करू शकणे ही महापालिकेची नामुष्की असल्याचे संतोष खताळ म्हणाले. वॉटरग्रेसचा मनमानी कारभार यापुढेही सहन केला जाईल का, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

मग बिल कसे अदा केले? 
सभापती बैसाणे यांनी वॉटरग्रेसला बिल कसे अदा झाले, असा प्रश्‍न केला. आता रिलायबल एजन्सीही असमर्थता दाखवत असल्याने पुढे काय, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर सहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी पर्यायी व्यवस्थेपर्यंत वॉटरग्रेसकडून काम सुरू राहणार आहे, असे स्पष्टीकरण दिले. वॉटरग्रेसबाबत अनेक तक्रारी असल्याचे सहाय्यक आयुक्त विनायक कोते यांनीही मान्य केले. 
 
‘सकाळ’ झळकला 
कचरा संकलनप्रश्‍नी ‘सकाळ’ने शुक्रवारी (ता. १४) ‘धुळे शहरात कचरा संकलनाचा जांगडगुत्ता’ या शीर्षकाखाली समस्या मांडली होती. ‘सकाळ’ची ही बातमी स्थायीत गाजली. सदस्य मासुळे यांनी ‘सकाळ’चा अंक सभागृहात दाखवत कचरा संकलनप्रश्‍नी नवनवीन शब्द ऐकायला मिळत आहेत, महापालिकेची नामुष्की होत असल्याचे सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation sthayi cameety meet city cleaning issue