आता विषय मांडतांनाही लाज वाटते..; धुळे मनपात कोण म्‍हणतेय असं.. 

रमाकांत घोडराज
Thursday, 29 October 2020

देवपूर भागातील भुयारी गटार योजनेच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्‍न मांडला. त्याची सुरवातच आता विषय मांडतांनाही लाज वाटते अशा शब्दात केली.

धुळे : सभापती साहेब...आता विषय मांडतांनाही लाज वाटते अशा शब्दात देवपूरमधील नगरसेवक कमलेश देवरे यांनी आज (ता.२९) स्थायी समिती सभेत आपला संताप व उद्विग्नता व्यक्त केली. भुयारी गटार योजनेमुळे झालेल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबतचा त्यांचा प्रश्‍न होता. कामात सुधारणा होणार नसेल तर नाइलाजाने सभागृहात आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला. श्री. देवरे यांच्या या भावना अत्यंत हलक्या पद्धतीने घेत सभापती सुनील बैसाणे यांनी नेहमीप्रमाणे ठेकेदाराला अल्टिमेटम दिला आहे, कारवाई करण्यास मागे-पुढे पाहणार नाही असे गुळमुळीत उत्तर देत बोळवण केल्याचे पाहायला मिळाले. 

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (ता.२९) सकाळी अकराला ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही स्वरूपात झाली. सभापती सुनील बैसाणे, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य कमलेश देवरे, अमोल मासुळे, नंदू सोनार, युवराज पाटील, संतोष खताळ आदी प्रत्यक्ष सभागृहात तर अन्य सदस्य व अधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. सभेत विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य श्री. देवरे यांनी पुन्हा एकदा देवपूर भागातील भुयारी गटार योजनेच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्‍न मांडला. त्याची सुरवातच त्यांनी आता विषय मांडतांनाही लाज वाटते अशा शब्दात केली. रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत खासदार, इतर लोकप्रतिनिधी, आयुक्त, स्वतः आपण (सभापती) या सर्वांनी बैठका घेतल्या, एमजेपीचे अधिकारी, ठेकेदाराचे प्रतिनिधी यांना कामाबाबत निर्देश दिले. मात्र, या कामाबाबत काहीही प्रगती नाही. रस्त्यांवर खडी टाकून ठेवल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाडीभोकर रोडवर दररोज ट्रॅफिक जॅमची समस्या उदभवते. एक वयोवृद्ध व्यक्ती दुचाकीवरून पडले. त्यामुळे समस्या कधी सुटेल असा प्रश्‍न आहे. 

अधिकाऱ्यांची डाळ शिजत नाही 
ठेकेदारापुढे एमजेपीच्या अधिकाऱ्यांची डाळ शिजत नाही. ठेकेदार दादागिरी करतो. ठेकेदार एमजेपीचा जावई आहे का असा संतप्त सवाल श्री. देवरे यांनी केला. ठेकेदाराला एकदा सभेत बोलवा अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आम्ही नगरसेवक तर बदनाम झालोच आहोत पण सत्ताधारी पक्षाचीही पूर्ण बदनामी झाल्याचे श्री. देवरे म्हणाले. 

सभापतींकडून अजब युक्तिवाद 
श्री. देवरे यांच्या संतप्त भावना ऐकून घेत सभापती श्री. बैसाणे यांनी नेहमीप्रमाणे ठेकेदाराला अल्टिमेटम दिला आहे, प्रसंगी कारवाईला मागेपुढे पाहणार नाही असे गुळमुळीत उत्तर दिले. सत्ताधारी पक्षाच्या बदनामीच्या मुद्द्यावरही श्री. बैसाणे यांनी लंगडे समर्थन करण्याचा प्रयत्न करत भुयारी गटारचे काम एमजेपी करत असल्याचे नागरिकांना माहीत नव्हते ते आता माहीत झाल्याने नागरिकांचा महापालिकेवरील रोष दूर झाल्याचा युक्तिवाद केला.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation sthayi camitee meeting road issue