नाव चमकले... आता टिकविण्याचे आव्हान...स्वच्छ सर्वेक्षण-२०२० चा निकाल 

रमाकांत घोडराज
Monday, 24 August 2020

खरंच धुळे शहर एवढे स्वच्छ आहे का, स्वच्छतेच्या अनुषंगाने खरंच शहरात चांगली कार्यवाही होते का? असा प्रश्‍न आहे. याचे वस्तूस्थितीदर्शक व प्रामाणिक उत्तर... ‘नाही‘ असेच आहे. असो...परीक्षेत चमकलोच आहोत, तर मग आता लौकिक टिकवून ठेवण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणेला पेलावे लागणार आहे. 

धुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये दहा लाखांखालील लोकसंख्येच्या गटात धुळे शहराने राज्यात द्वितीय आणि देशात थेट नववा क्रमांक पटकावला. याबद्दल महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी कौतुकास पात्र आहेत. या चमकदार कामगिरीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. पण... खरंच धुळे शहर एवढे स्वच्छ आहे का, स्वच्छतेच्या अनुषंगाने खरंच शहरात चांगली कार्यवाही होते का? असा प्रश्‍न आहे. याचे वस्तूस्थितीदर्शक व प्रामाणिक उत्तर... ‘नाही‘ असेच आहे. असो...परीक्षेत चमकलोच आहोत, तर मग आता लौकिक टिकवून ठेवण्याचे आव्हान महापालिकेच्या यंत्रणेला पेलावे लागणार आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० स्पर्धेच्या निकालाने धुळेकरांचे बोट तोंडात गेले नसेल तरच नवल. स्वच्छतेच्या कामगिरीत देशपातळीवर धुळ्याने पहिल्या दहात स्थान पटकाविले. राज्यात तर धुळे शहर थेट दुसऱ्या क्रमांकावर आले. २०१८ मध्ये ७८ आणि २०१९ मध्ये १०० व्या पायरीवर असलेल्या धुळे शहराने २०२० मध्ये थेट नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ही बाब निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे महापालिकेचे विशेषतः अधिकारी सुखावले आहेत. 

वस्तुस्थिती वेगळी 
स्वच्छतेत धुळे शहराने देशाच्या पातळीवर चमकावे एवढी स्वच्छता धुळ्यात आहे का, कचरा संकलनापासून प्रक्रियेपर्यंत खरंच दखल घेण्याजोगे काम झाले आहे का, या प्रश्‍नाचे प्रामाणिक उत्तर ‘नकारार्थी‘ असेल अशी स्थिती आहे. शहरात घाण, कचऱ्याचे साम्राज्य नाही, यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. 

...तर तक्रारी नसत्या 
घंटागाडी कचरा संकलनासाठी आठ-आठ दिवस फिरकत नाही, साफसफाई होत नाही, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आहे. अशा स्वच्छतेशी निगडित समस्यांच्या तक्रारी नागरिकच नव्हे, तर नगरसेवक, पदाधिकारीही करताना दिसतात. गेल्या काही महिन्यांचा इतिहास पाहिला तर याप्रश्‍नी स्थायी समिती सभेतही नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरल्याचे आयुक्तांपुढे गाऱ्हाणे मांडल्याचे चित्र धुळेकरांनी पाहिले आहे. कचरा संकलन करणारी मंडळी, तर कचरा न घेता दगड-माती उचलून नेत असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. या सर्व समस्या असतील तर मग धुळे शहर स्वच्छ कसे, असा साहजिक प्रश्‍न उभा राहतो. 
 
या गुणांनी केली कमाल 
स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये धुळे महापालिकेला ६००० पैकी ४८९६.९९ गुण मिळाले. यातील विशेष बाब म्हणजे जे धुळेकर नागरिक अस्वच्छता, कचरा संकलनाबाबत तक्रारी करतात त्या धुळेकरांनी चांगला फिडबॅक दिल्याने १५०० पैकी १२६०.६४ गुण मिळाले आहेत. घंटागाडी नियमित, रोज येते का, नियमित साफसफाई होते का, घंटागाडीत ओला- सुका कचरा घेतला जातो का, स्वच्छ सर्वेक्षण-२०२० बाबत माहिती आहे का, कचरामुक्त शहर, हागणदारीमुक्तीचा दर्जा माहीत आहे का आदी प्रश्‍नांचा यात समावेश होता. प्रत्यक्ष पाहणीसाठी आलेल्या त्रयस्थ संस्थेलाही शहरात सर्वकाही चांगले दिसले. त्यामुळे त्यांनीही १५०० पैकी तब्बल १४१०.६४ गुण दिले हे विशेष.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation swach sarvekshan top in state but live no cleanup