शास्तीत सूट मिळविण्यासाठी गर्दी; शंभर टक्के सवलतीमुळे पदरात लाभ 

निखील सुर्यवंशी
Sunday, 10 January 2021

वसुलीच्या उद्दीष्ट्यासाठी महापालिकेने नववर्षात मालमत्ता करावरील शास्ती शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला. यात १ ते १५ जानेवारीपर्यंत शंभर टक्के शास्ती माफ असेल.

धुळे : येथील महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करावरील शास्तीत (दंड) शंभर टक्के सूट देण्याची घोषणा झाली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेत शनिवारी (ता. ९) सुटीचा दिवस असूनही मालमत्ताधारकांनी गर्दी केली होती. महापालिकेच्या या भूमिकेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. 

वसुलीच्या उद्दीष्ट्यासाठी महापालिकेने नववर्षात मालमत्ता करावरील शास्ती शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला. यात १ ते १५ जानेवारीपर्यंत शंभर टक्के शास्ती माफ असेल. नंतर १६ ते ३१ जानेवारीपर्यंत ५० टक्के शास्ती माफ होईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या जुन्या इमारतीत बँक काउंटरवर मालमत्ताधारकांची रांग लागल्याचे दिसून आले. महापालिकेत १ ते १५ जानेवारीपर्यंत एक कोटी २० लाख ८६ हजार ३६९ रुपयांचा कर भरणा झाला आहे. 

ई-कनेक्‍ट ॲपचा वापरही शक्‍य
यापूर्वी कर भरलेल्या मालमत्ताधारकांना या सुविधेचा लाभ मिळणार नाही. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी धुळे ई-कनेक्ट अॅपचा वापर करता येईल. तसेच धनादेश व रोखीने कर भरता येईल, अशी माहिती महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, महिला बालकल्याण समिती सभापती स्नेहल जाधव, उपसभापती रेखा सोनवणे, सभागृह नेते कांतीलाल दाळवाले, विरोधी पक्षनेते साबीर शेख यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation tax discount people line counter