व्यापाऱ्याला २५ हजार दंड; एक टन मालही केला जप्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान सध्या राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षण, संवर्धनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

धुळे : स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेच्या पथकाने आज (ता.४) एका गोडावूनमधुन साधारण एक टन प्लॅस्टिक माल जप्त केला. संबंधित व्यापाऱ्याकडून २५ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. अभियानांच्या निमित्ताने का होईना महापालिकेकडून पुन्हा एकदा प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने कारवाई होत आहे. 

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ व माझी वसुंधरा अभियान सध्या राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षण, संवर्धनाच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यात प्लॅस्टिक बंदी कायदा लागू असताना प्लॅस्टिकचा वापर व विक्री होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाकडून प्लास्टिकबंदींचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यात आज (ता.४) मुंबई-आग्रा महामार्गावरील गायत्री प्लॅस्टिक या गोडाऊनवर कारवाई झाली. 

एक टनचा माल आढळला
पथकाला येथे साधारण एक टन प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा आढळून आला. पथकाने तो जप्त केला. शिवाय संबंधित व्यापाऱ्याकडून २५ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशाने उपायुक्त शांताराम गोसावी, साहाय्यक आयुक्त विनायक कोते, साहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, संदीप मोरे, विकास साळवे, महेंद्र ठाकरे, अनिल जावडेकर, मुकादम शशिकांत जाधव, रुपेश पवार, एआयआयएलएसजीच्या शरयू सनेर, श्रीनाथ देशपांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation use plastic carry bag action