धुळ्यात पाणीपुरवठ्याचे नियोजन पुन्हा कोलमडले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्‍यामुळे लॉकडाउन आहे. त्यातच शहराच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहराचा बहुतांश भाग "सील' झाला आहे. अशा संकटकाळात काही भागात नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.

धुळे : तापी पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा शनिवारी (ता.2) खंडीत झाल्यामुळे शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पुन्हा एकदा कोलमडले आहे. देवपूरमधील काही भागात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्याने येथील रहिवाशांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेनेही याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नागरिकांपर्यंत न पोहोचवल्याने पाणीपुरवठा कधी होणार, याबाबत नागरिक संभ्रमात आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या धोक्‍यामुळे लॉकडाउन आहे. त्यातच शहराच्या विविध भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने शहराचा बहुतांश भाग "सील' झाला आहे. अशा संकटकाळात काही भागात नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे. देवपूरमधील जे. बी. बडगुजर कॉलनी, पंचवटी गॅस एजन्सी व परिसरात गेल्या सहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. काहीजणांना पिण्याच्या पाण्यासाठी जार मागवावे लागत आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. काहीजण पाण्यासाठी इतरत्र शोधाशोध करत आहेत.

वीज खंडित झाल्याने समस्या
दरम्यान, याबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता. वेगळीच माहिती समोर आली. शनिवारी (ता.2) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेवरील वीजपुरवठा सकाळी दहा ते दुपारी तीनदरम्यान बंद झाला होता. त्यामुळे या योजनेवरील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. तापी योजनेवरून ज्या-ज्या भागात पाणीपुरवठा होतो त्या-त्या भागात नियोजित वेळापत्रकापेक्षा विलंबाने पाणीपुरवठा होत आहे.

नागरिकापर्यंत माहितीच नाही
वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विलंबाने होत असल्याबाबत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आलेली नाही. त्यामुळे नियोजित दिवशी पाणीपुरवठा का झाला नाही, पाणीपुरवठा कधी होणार याबाबत नागरिकांना काहीही माहिती नाही. घरात साठवलेले पाणीही संपल्याने पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना शोधाशोध करावी लागत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation water suplay sechuld