कुरिअर कंपनी कार्यालयातून अडीच लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

मिल परिसरातील चितोड रोड भागातील हुडको कॉलनीत प्लॉट क्रमांक 2 येथे ऍमेझॉन कंपनीसह इतर कंपन्यांचे कुरिअर कार्यालय आहे. मंगळवारी रात्री उशिरा कार्यालय बंद झाले.

धुळे : शहरातील मिल परिसरातील चितोड रोड भागातील क्रांती चौकाला लागून असलेल्या हुडको कॉलनीत बुधवारी पहाटे चोरट्यांनी एका कुरिअर कंपनीचे कार्यालय फोडून अडीच लाख रुपयांची रोकड पळवून नेली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस आणि पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी श्‍वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. 
मिल परिसरातील चितोड रोड भागातील हुडको कॉलनीत प्लॉट क्रमांक 2 येथे ऍमेझॉन कंपनीसह इतर कंपन्यांचे कुरिअर कार्यालय आहे. मंगळवारी रात्री उशिरा कार्यालय बंद झाले. रात्री अडीचच्या सुमारास दरवाजाचे कुलूप तोडून चोर कार्यालयात शिरला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर काढली. चोरी झाल्यानंतर उपअधीक्षक हिरे, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह हवालदार नौशाद सय्यद, पोलिस शिपाई शाकीर शेख, उमेश पवार, रविकिरण राठोड आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर फिंगरप्रिंट एक्‍स्पर्ट सहाय्यक पोलिस निरीक्षक वाय. पी. राजपूत, प्रशांत माळी, ए.एस.आय. काझी, मंगळे, श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्‍वानाने घटनास्थळापासून क्रांती चौकापर्यंत माग काढला. चोरी झालेल्या कार्यालयात सुमारे 19 तरुण कुरिअर पोचविण्याचे काम करतात. दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शहर पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. 
 
कर्मचाऱ्यांमुळे चारीची घटना उघड : 
काउंटरमध्ये ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड पळविली. चोरटा दोन वाजून पाच मिनिटांनी आत आला आणि मागून पळाला. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यानंतर साडेतीनच्या सुमारास कुरिअर वस्तूंची गाडी कार्यालयात आली. त्या वेळी चोरी झाल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी व्यवस्थापक विजय पवार यांना भ्रमणध्वनीवरून माहिती कळविली. ते घटनास्थळी आले. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कशी झाली हे दिसले. बुधवारी सकाळी ही घटना शहर पोलिसांना कळविण्यात आली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule courier office 1.5 lakh cash robbery