नात्याला काळिमा फासणारी घटना ;चुलत काकाने पुतणीवर केला अत्याचार !

भगवान जगदाळे
Monday, 16 November 2020

आरोपीने दोन वेळा बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या व औषधे दिली. गोळ्या औषधे घेण्यास नकार दिला असता संशयिताने पीडितेच्या पोटावर बुक्क्यांचा मार दिला.

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील गुलतारा (ता.साक्री) येथील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या विवाहित चुलत काकाने सलग दीड ते दोन वर्षांपासून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याने संशयिताचे बिंग फुटले. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काका-पुतणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या संशयितास अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाचा - प्रसिध्द सराफ व्यवसायीक रतनलालजी बाफना यांचे निधन -

पीडित अल्पवयीन मुलीने निजामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार- गुलतारा (ता.साक्री) येथील प्रवीण चैत्राम ठाकरे उर्फ तात्या या नराधमाने घराशेजारीच राहणाऱ्या त्याच्या अल्पवयीन पुतणीला सुरुवातीला गोड बोलून, इशाऱ्यांनी व नवीन कपडे घेऊन देण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. दहीवेल येथून मिठाईसारखा गोड पदार्थ आणून तो अधूनमधून तिला खायला देत असे व दुपारी तिच्या घरी कोणी नसताना तिच्याशी बळजबरीने अनैतिक शारीरिक संबंध ठेवत असे. गेल्या दीड वर्षांपासून हा हिडीस प्रकार सुरू होता. पीडित मुलीचे आईवडील शेतात राहतात, तर ती तिच्या भाऊ व वहिनीकडे गावात राहत असे.

दरम्यान सुमारे पाच ते सहा वेळा बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने पीडित मुलगी गरोदर राहिल्याने तिने सदर माहिती संशयितास दिली. त्याबाबत कोणास काही सांगितल्यास उलट तिलाच जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलीस 12 व 13 नोव्हेंबर रोजी दुपारी अकरा ते बारा वाजेदरम्यान आरोपीने दोन वेळा बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या व औषधे दिली. गोळ्या औषधे घेण्यास नकार दिला असता संशयिताने पीडितेच्या पोटावर बुक्क्यांचा मार दिला. दरम्यान काल (ता.15) दुपारी चारच्या सुमारास पीडित मुलीस पोटात असह्य वेदना होऊ लागल्याने ती शेतात आईवडिलांकडे गेली व त्यांना घडलेली हकीकत सांगितली. सुरुवातीला ती वडिलांशी खुलून बोलत नसल्याने त्यांनी तिला झोपडीत बसवून तिच्या आईला तिची सविस्तर विचारपूस करण्यास सांगितले तेव्हा घटनेचा उलगडा झाला.

त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने पीडित मुलीचे आईवडीलही घाबरले. थोड्या वेळाने मुलीच्या गुप्तांगातून अपूर्ण वाढ झालेले लहान अर्भक खाली जमिनीवर पडले. रक्तस्राव थांबल्यानंतर मृत अर्भक सोबत घेऊन पीडित मुलीने आईवडिलांसह रात्री उशिरा निजामपूर पोलीस स्टेशन गाठले व घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रवीण ठाकरेविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात बाललैंगिक संरक्षण(पोक्सो) कायद्यान्वये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवत संशयितास रात्रीच ताब्यात घेतले. आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ व पोलीस उपनिरीक्षिका श्रीमती मोनिका जेजोट यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

आवश्य वाचा- शंखनादाने श्री बालाजी मंदीर, पाडवा पहाटने झपाटभवानी मंदीर भक्तांसाठी खुले -

अर्भकासह संशयित व पीडितेच्या डीएनए अहवालाकडे लक्ष!
दरम्यान आज (ता.16) सकाळीच जैताणे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षवर्धन चित्तम यांनी अर्भकासह पीडित मुलीच्या डीएनएचे नमुने घेतले असून संशयिताच्याही डीएनएचा नमुना घेतला जाणार आहे. मृत अर्भकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून तिघांच्या डीएनए अहवालांकडे पोलीस यंत्रणेसह ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule cousin tortured his uncle filed a case at the police station