esakal | "कोविड' व्यवस्थापनासाठी 36 समित्यांची स्थापना 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule medical collage

रूग्णांना अधिक दर्जेदार सेवा, सोयीसुविधा देण्यासाठी नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सूक्ष्म नियोजन करत तब्बल 36 निरनिराळ्या समित्यांची आज स्थापना केली. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे.

"कोविड' व्यवस्थापनासाठी 36 समित्यांची स्थापना 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : परजिल्ह्यांसह धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक भार येथील हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयावर आहे. त्यात कमी मनुष्यबळ, विविध अडीअडचणी, समस्यांचा सामना व्यवस्थापनाला करावा लागत आहे. तरीही तीन महिन्यांपासून कुठलिही तक्रार न करता आहे त्या मनुष्यबळात तीन "शिप्ट'मध्ये महाविद्यालय आणि रूग्णालय अहोरात्र, अथकपणे संसर्गजन्य कोरोना विषाणूशी मुकाबला करत आहे. त्यात रूग्णांना अधिक दर्जेदार सेवा, सोयीसुविधा देण्यासाठी नवनियुक्त अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सूक्ष्म नियोजन करत तब्बल 36 निरनिराळ्या समित्यांची आज स्थापना केली. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे. 
दरम्यान. या निर्णयामुळे तक्रारी कमी होऊन हिरे महाविद्यालयासह संलग्न रूग्णालयाची प्रतिमा उंचावून कार्यरत डॉक्‍टर, सेवक कर्मचारी अर्थात "कोरोना योध्दां'चे मनोधैर्य उंचावण्यास मदत होणार आहे. 

आवर्जून वाचा - "कोरोना' तपासणीसाठी खासगी "लॅब'चे साहाय्य
 

रूग्णांच्या माफक अपेक्षा 
हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील डॉक्‍टर, सेवक कर्मचाऱ्यांच्या कार्याचा आदरसन्मान राखत रूग्णांच्या काही अपेक्षा "सकाळ' वस्तुनिष्ठ स्वरूपात मांडत आहे. पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा, वेळेत नास्ता व जेवण आणि स्वच्छताही वेळोवेळी व्हावी, तसेच रूग्ण दाखल होताना सुकर प्रक्रिया असावी, वेळेत उपचार व्हावे, पीडित नातेवाईकांना दुःखद प्रसंगी सर्वोतोपरी सहकार्य मिळावे, त्यांना सुरक्षिततेच्या साधनां अभावी "आयसीयू' कक्ष किंवा वॉर्डातील काही कामांचा भार टाकला जाऊ नये, अशी माफक व्यक्त होत होती. ती "सकाळ'ने मांडल्यानंतर त्याची दखल जिल्हाधिकारी संजय यादव, महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी घेतली. 

विविध "वॉर्ड' चकाचक 
या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयाने कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आज सकाळपासून युध्दपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली. "पीपीई ड्रेस' परिधान करत कर्मचारी कामाला लागले. त्यांनी विविध वॉर्ड चकाचक केले. प्रसाधनगृहांपासून वॉर्ड व पॅसेजमध्ये स्वच्छता मोहीम राबविली. विविध मजल्यांवर, वॉर्डलगत पाण्याचे जार ठेवण्यात आले. नंतर काही रूग्णांचे अभिप्राय घेण्यात आले. स्वच्छता, जेवण, नास्ता, पिण्याच्या पाण्याची सोय याबाबत आता काही अडचणी, समस्या आहे का, झालेल्या कामाबाबत काय वाटते? यावर काही अभिप्राय "व्हीडीओ क्‍लिप'व्दारे घेण्यात आले. त्यात रूग्णांनी समाधान व्यक्त केले. या कार्यात सातत्य राखण्याची जबाबदारी व्यवस्थापनावर असेल. 

निरनिराळ्या समित्या कुठल्या? 
बारीकसारीक गोष्टीवरून महाविद्यालय आणि रूग्णालयाबाबत तक्रारी होऊ नये, जनमानसात गैरसमज निर्माण होऊ नयेत म्हणून "कोविड व नॉन कोविड' व्यवस्थापनासाठी अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी निरनिराळ्या 36 समित्यांची स्थापना केली. त्याचा कृती आराखडा सायंकाळी पूर्ण झाला होता. यात प्रत्येक डॉक्‍टर / प्राध्यापकावर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. उपचारासह स्वच्छता, पाणी, जेवण, औषधे, रूग्णवाहिका, मृतदेहाबाबत सोपस्कार, कुठल्या गोष्टीची कुणाला कमतरता, विविध पत्रव्यवहार, अंमलबजावणी व तपासणी, कर्मचारी सहाय्य, संरक्षक साधनांची गरज, प्रशासकीय देखरेख, तांत्रिक सहाय्य, "प्रोटोकॉल' यासह सूक्ष्म नियोजनातून निरनिराळ्या 36 व पूर्वीच्या दोन मिळून एकूण 38 समित्या आता दिलेल्या जबाबदारीनुसार व्यवस्थापन करतील. त्यामुळे नियोजनातून कामकाज होऊन महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयाबाबत तक्रारी कमी होण्यास मदत होऊ शकेल. 
 
रूग्ण, नातेवाईकांनी "पॅनिक' होऊ नये... 
हिरे महाविद्यालय व जिल्हा रूग्णालयातील सर्व "कोरोना योध्दा' अहोरात्र, अथक तीन "शिफ्ट'मध्ये सेवा देत आहेत. "कोरोना'बाबत भितीचे वातावरण असताना संबंधित डॉक्‍टर, सर्व कर्मचारी कार्यतत्पर आहेत. अशावेळी रूग्ण किंवा नातेवाईकांनी सहकार्य केले पाहिजे. रूग्णालयात "कोविड' व "नॉन कोविड' रूग्णांवर उपचार सुरू असताना कामकाजात काही उणीवा राहू शकतात. त्याबाबत सातत्याने तक्रारींऐवजी मार्ग काढण्यासंदर्भात सहकार्य केले पाहिजे. रूग्ण किंवा नातेवाईकांनी "पॅनिक' होऊन डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचणार नाही यादृष्टीनेही सहकार्य करावे, अशी अपेक्षा वर्तुळातून व्यक्त झाली. 
 

loading image