रस्त्याचे वाजले बारा; रुग्ण जातील कसे? 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

शहरात २४ जुलैला मुसळधार पावसामुळे आणि नकाणे तलावाच्या सांडव्यातील प्रवाहामुळे जवाहर मेडिकल फाउंडेशन, हरणमाळकडे रस्ता गेला वाहून गेला. २० ते ३० फुटांच्या रस्त्याची पार चाळण झाली. त्यामुळे रुग्णालयाचा संपर्क तुटला.

धुळे : जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच संबंधित संस्थांकडे वारंवार मागणी करूनही साक्री रोडवरील जवाहर मेडिकल फाउंडेशनकडे जाणारा रस्ता अद्याप तयार झाला नाही. पंधरा दिवसांपूर्वी धुवाधार पावसात वाहून गेलेला रस्ता आजही दुरवस्थेच्या स्थितीत आहे. त्यामुळे फाउंडेशनच्या रुग्णालयाचा तसेच हरणमाळ गावाचा संपर्क तुटलेलाच आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून रुग्णालयाने लहानसा लोखंडी पूल तयार केला असला तरी तो कधीही जिवावर बेतू शकतो. 
शहरात २४ जुलैला मुसळधार पावसामुळे आणि नकाणे तलावाच्या सांडव्यातील प्रवाहामुळे जवाहर मेडिकल फाउंडेशन, हरणमाळकडे रस्ता गेला वाहून गेला. २० ते ३० फुटांच्या रस्त्याची पार चाळण झाली. त्यामुळे रुग्णालयाचा संपर्क तुटला. संकटकाळात जिल्ह्यात एकमेव फाउंडेशनच्या एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय नॉन कोविड रुग्णांना पूर्ण क्षमतेने सेवा देत आहे. रस्त्याचे बारा वाजल्याने प्रसूती सुविधा, अपघातग्रस्त रुग्ण, अन्य शस्त्रक्रियांची गरज असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. आजारी रुग्ण कसे बसे जीव मुठीत घेऊन तुटलेला रस्ता ओलांडतात. नव्हे तर रुग्णालयातील कार्यरत चारशेहून अधिक कर्मचारी रोज पायपीट करत रुग्णालय गाठतात. ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ डॉक्टरांना या समस्येमुळे सक्तीने घरी राहावे लागत आहे. रात्री-अपरात्री अपघाताची शक्यता बळावली आहे. हरणमाळ ग्रामस्थांना कुठलीही सेवा मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर स्थितीकडे लक्ष घालण्याची मागणी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule covid hospital road damage