esakal | अरे बापरे...दोन दिवसात दोन विवाहितांसह धुळे जिल्‍ह्यातून अकरा जण बेपत्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

missing

शिंदखेडा येथील बी. के. देसलेनगर येथे वास्तव्यास असलेला पवन निवृत्ती व्यवहारे (वय २५) बेपत्ता झाला. त्याने दोंडाईचात महिला बचतगटाचे ४६ हजार रुपये संकलित केले. नंतर त्याने शिंदखेडा येथे येत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले.

अरे बापरे...दोन दिवसात दोन विवाहितांसह धुळे जिल्‍ह्यातून अकरा जण बेपत्ता 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात ११ जण बेपत्ता झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांत झाली. त्यात तरुणांसह तरुणीचाही समावेश आहे. यात बचतगटाचे ४६ हजार रुपये संकलित करणाराही बेपत्ता झाल्याची घटना घडली. दोन ते तीन दिवसांत या घटना घडल्या. 

हेही पहा- काय सांगतात राव, कोंबड्यांनी लावली हो माणसांमध्ये झुंज !


शिंदखेडा येथील बी. के. देसलेनगर येथे वास्तव्यास असलेला पवन निवृत्ती व्यवहारे (वय २५) बेपत्ता झाला. त्याने दोंडाईचात महिला बचतगटाचे ४६ हजार रुपये संकलित केले. नंतर त्याने शिंदखेडा येथे येत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. प्रत्यक्षात तो आलाच नाही. तो बेपत्ता झाल्याची माहिती विश्वनाथ व्यवहारे यांनी पोलिसांना दिली. धुळे शहरातील चितोड रोडवरील रासकरनगरातील शुभम शरद हजारे (२०) बेपत्ता झाला आहे. कपडे इस्त्री करण्यासाठी तो घराबाहेर पडला. नंतर तो परतलाच नाही. तो बेपत्ता झाल्याची माहिती कांताबाई हजारे यांनी पोलिसांना दिली. रासकरनगरमधील १९ वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. मैत्रिणीला भेटून येते, असे सांगत ती निघाली, नंतर घरी परतली नाही, अशी माहिती पालकांनी शहर पोलिस ठाण्याला दिली. धुळे शहरातील फिरदोसनगरमधील अब्दुल कादीर अन्सारी (६५) घरातून निघून गेल्याची माहिती मोहम्मद आयुब अन्सारी यांनी चाळीसगाव रोड पोलिसांना दिली. अकलाड (प्र. नेर) येथील भटू लोटन सूर्यवंशी (३०) घरातून निघून गेल्याची माहिती राजेंद्र सूर्यवंशी यांनी धुळे तालुका पोलिस ठाण्याला दिली. खलाणे (ता. शिंदखेडा) येथील भुराबाई अंकुश भिल (३०) ही महिला २० ऑगस्टपासून सात वर्षांचा मुलगा संदीप आणि पाच वर्षांची मुलगी संध्यासह बेपत्ता आहे. पती अंकुश भिल यांनी शिंदखेडा पोलिसांना माहिती दिली. देगाव येथील सुनंदा इंदास महिरे (३२) ही महिला मुलगा दीपेश (५) आणि मुलगी अश्विनीसह बेपत्ता असल्याची माहिती श्री. महिरे यांनी शिंदखेडा पोलिसांना दिली. 


कर्जाच्या वादातून वृद्धाला मारहाण 
धुळे : पीककर्जाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला मारहाण आणि संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केल्या प्रकरणी संशयित तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पीडित शेतकरी दयाराम मोतीराम शिरसाट (वय ६८, रा. जापी, ता. धुळे) यांनी फिर्याद दिली. भूषण ठाकरेमार्फत पीककर्ज काढले नाही म्हणून त्याच्यासह राकेश ठाकरे, राजधर ठाकरेने बेदम मारहाण केल्याची, घरातील साहित्याची तोडफोड केल्याची तक्रार आहे. 


पारोळ्यातील जखमीचा मृत्यू 
धुळे : पारोळा (जि. जळगाव) जवळ झालेल्या अपघातात जखमी वृद्धाचा सोमवारी धुळ्यात मृत्यू झाला होता. रमेश शिरोडे (वय ६१, रा. पारोळा) असे त्याचे नाव आहे. देवपूर पोलिस ठाण्याने संबंधित कागदपत्रांच्या संकलनानंतर ती पारोळा पोलिस ठाण्याकडे पाठविली. त्यांच्या मोटारसायकलला मालवाहू वाहनाने मागून धडक दिली होती. त्यात शिरोडे जखमी झाले होते. १२ ऑगस्टला सकाळी हा अपघात झाला होता. जखमी झाल्यावर ते धुळे शहरातील देवपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यात मृत्यूनंतर सोमवारी (ता. २४) रात्री देवपूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली. 
 

loading image