esakal | धुळे जिल्ह्यात गावठी कट्ट्याच्या गैरउद्योग अडकले तरुण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

धुळे जिल्ह्यात गावठी कट्ट्याच्या गैरउद्योग अडकले तरुण

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी
धुळे :
शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी काही दिवसांपासून पोलिसांतर्फे (police) होत असलेल्या कारवाईत गावठी कट्टे (Revolver), जिवंत काडतुसांसह (Bullet) तरूण सापडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. शहरी आणि ग्रामीण भागात गावठी कट्ट्याचे लोण पसरल्याने, त्यात तरूण अडकत असल्याने त्यांना गुन्हेगारीच्या नादी लावणाऱ्यांचाही शोध घेणे तितकेच गरजेचे ठरणार आहे. या स्थितीवर यंत्रणेने गांभीर्याने पावले उचलली नाही तर जिल्ह्याची अपकीर्ती होण्यास वेळ लागणार नाही.

रम्यान, येथील बाजार समितीत पिस्टल विक्रीचा होणारा व्यवहार आझादनगर पोलिसांनी रविवारी (ता. ११) रात्री उधळून लावला. पथकाने जिवंत काडतुसांसह दोन संशयितांना गजाआड केले. तसेच दुसऱ्या कारवाईत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने आर्वी (ता. धुळे) गावातून गावठी कट्यासह एकाला जेरबंद केले. (crime of selling young pistols in dhule district)

हेही वाचा: भीषण दुर्घटना; कार-दुचाकीच्या अपघातात तीन ठार


वेशांतरातून बाजार समितीत कारवाई
शहरातील पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पिस्टल आणि जिवंत काडतूस विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली. त्यांनी कर्मचारी पथकासह बाजार समितीत सापळा रचला. खासगी वाहनाने आणि हमालाचा वेश परिधान करत पोलिस पथक बाजार समितीत पोहचले. रविवारी रात्री दुचाकीवरून (एमएच ४१ एन ७४७१) दोन जण धान्य विक्रीच्या शेडजवळ थांबले. त्यांना पोलिसांचा संशय आला. त्यामुळे त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पाठलाग करत पथकाने मोहम्मद इरफान मोहम्मद कौसर अन्सारी (रा. वडजाई रोड, धुळे) व साहील सत्तार शाह (रा. रामदेवबाबानगर, धुळे) यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता पंधरा हजार किमतीचे गावठी पिस्टल, पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस तसेच मोबाईल आढळला. पोलिसांनी दुचाकीसह ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्ण अडीचशेच्या टप्प्यात


एलसीबीची ग्रामीण भागात कारवाई
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना आर्वीतील (ता. धुळे) तुषार शिवाजी शेगर हा गावठी कट्टा घेऊन गावात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक योगेश राऊत आणि पथकाला कारवाईचा आदेश दिला. श्री. राऊत व पथकाने रविवारी (ता. ११) रात्री पावणेदहाच्या सुमारास आर्वी येथे कारवाई करत संशयित तुषारला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २६ हजार किमतीचा गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस आढळले. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बाजार समितीतील कारवाई आझादनगरचे पोलिस निरीक्षक कोकरे, पोलिस उपनिरीक्षक भिकाजी पाटील, हवालदार सुनील पाथरवट, दगडू कोळी, जयेश भागवत, आसिफ शेख, शोएब बेग, रमेश गुरव यांच्या पथकाने, तर आर्वी येथील कारवाई एलसीबीचे निरीक्षक बुधवंत, उपनिरीक्षक राऊत, सुशांत वळवी, कुणाल पाटील, रवी किरण राठोड, विशाल पाटील, उमेश पवार यांनी केली. त्यांना पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.

loading image