दसऱ्याला सोने वाटप अन्‌ चरणस्पर्शालाही प्रतिबंध..!

जगन्नाथ पाटील
Friday, 23 October 2020

दसऱ्याला आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात हस्तांरीत होत असतात. यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून तशी काळजी व्यक्त होत आहे.

कापडणे (धुळे) : घटस्थापनेनंतर दहाव्या दिवशी दसरा साजरा होत असतो. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना सोने अर्थात आपट्याची पाने देत स्नेह, प्रेम व आपुलकी व्यक्त केली जाते. मात्र ही आपट्याची पाने एकमेकांना देण्यास प्रशासनाचा नकारच आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अर्थात दसऱ्याचे सोने लुटणे आणि वितरीत करण्यास मज्जाव असल्याचे पुढे आले आहे. म्हणजेच आता दसऱ्याला नो सोने वाटप नो चरणस्पर्श...! अशीच स्थिती राहणार आहे.

दसऱ्याला आपट्याची पाने मोठ्या प्रमाणात हस्तांरीत होत असतात. यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भिती जाणकारांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडून तशी काळजी व्यक्त होत आहे. खानदेशात खेडोपाडी शालेय विद्यार्थी घरोघरी जावून आपट्याची पाने देवून जेष्ठांना चरण स्पर्श करीत नमस्कार करतात. असा स्पर्श टाळण्याचे आवाहनही तज्ञ डॉक्टरांकडून जागतीसाठी करण्यात येत आहे.

शस्‍त्रपुजनास मज्जाव
दसऱ्याच्या दिवशी ठिकठिकाणी शस्‍त्रपुजन केले जाते. यासाठी पारंपारिक पध्दतीने पुजाविधीसाठी मोठी गर्दी होत असते. ही पुजाविधीही धोकेदायक आहे. म्हणून शस्‍त्र पुजन करु नये याबाबतही सोशल मिडीयावर पोस्ट व्हायरल होत आहे. 

ना सिमोल्लंघन ना शमी वृक्ष पूजन 
दसऱ्याला सिमोल्लंघन आणि शमी वक्षाची पुजा करण्याची वर्षोनुवर्षेची प्रथा परंपरा आहे. सिमोल्लंघनासाठी गटागटाने एकत्रित गर्दी करीत समवयस्क जातात. परतांना गाववेशीवरील शमी वक्षाचे पुजन होते. रावण दहनाचाही कार्यक्रम होत असतात. हे सर्व धोकेदायक असल्याने या परंपरेलाही मज्जाव करण्यात आला आहे. एकंदरीत हर्ष, आनंद व उत्साह उल्लसित करणार्‍या दसर्‍याच्या पारंपारिक प्रथा कोरोनाच्या कचाट्यात सापडल्याने आनंदावर विरजण पडणार आहे. यामुळे आबालवध्दांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule dasara utsav celebration limitation in coronavirus