कोरोना पाठोपाठ डेंगीचा ताप; चार रूग्‍ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

ज्या परिसरात डेंग्यू व तापाचे रुग्ण आढळले तेथे प्रत्यक्ष गृहभेटी देत कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. अबेटिंग करीत गटारीमध्ये ऑईल टाकण्यात आले. पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. 
 

म्हसदी (धुळे) : येथे डेंग्यू तापाचे चार रुग्ण आढळल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी मेघश्याम बोरसे यांनी दिली. सर्व लहान मुली असून रुग्ण साक्रीत उपचार घेत आहेत. 
ग्रामपंचायतीने जुन्या गावात धुरळणी केली.

प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या चार पथकांनी गृहभेटी देत कंटेनर सर्वेक्षण केले जात आहे. बुधवारी (ता. ७) सकाळी ए. पी. महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी बोरसे, आरोग्य सहाय्यक पी. व्ही. देवरे, एम. एन. शिंदे, आरोग्यसेवक संदीप पाटील, आशासेविका पद्मलता देवरे, जयश्री गवळे, रवींद्र देवरे, सचिन मोहिते, प्रवीण देवरे, सुषमा अंधारे, सुरेखा मोहिते, सीमा देवरे, आरोग्यसेवक जे. एफ. परदेशी, डी. एन. आंधळे, डी. एम. पारधी आदींनी मोहिमेत भाग घेतला. जुन्या गावातील गांधी चौक, मधली गल्ली व होळी चौक परिसरात धुरळणी करण्यात आली. ज्या परिसरात डेंग्यू व तापाचे रुग्ण आढळले तेथे प्रत्यक्ष गृहभेटी देत कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. अबेटिंग करीत गटारीमध्ये ऑईल टाकण्यात आले. पाण्याच्या टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. 
 
कोरडा दिवस पाळा 
कोरोनानंतर डेंग्यूचा शिरकाव झाल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य केंद्राचे प्रीतम माळी, प्रशासक ए. पी. महाले, ग्रामविकास अधिकारी बोरसे यांनी केले आहे. सध्या पावसाळा अंतिम चरणात असला, तरी विविध साथीच्या आजाराने थैमान घातले आहे, म्हणून प्रत्येक ग्रामस्थांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. जास्त दिवस पाणी संग्रही ठेवू नये, घर व परिसर स्वच्छ ठेवा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाणी उकळून वा स्वच्छ करून प्यावे, शिळे अन्न खाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule dengue fiver four patient in mhasdi village