अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

बिबट्या अन्न व पाण्याच्या शोधात निघालेला असताना महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. धडकेत बिबट्याच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त आले. यातच त्याचा मृत्यू झाला.

देऊर (धुळे) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अक्कलपाडा (ता. साक्री) गावाजवळील वळणरस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. दरम्यान आज (शनिवारी) सकाळी अकराच्या सुमारास अक्कलपाडा महिर वनक्षेत्रात बिबट्याचा पंचनामा करून वन कर्मचाऱ्याच्‍या उपस्‍थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बिबट्या अन्न व पाण्याच्या शोधात निघालेला असताना महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. धडकेत बिबट्याच्या डोक्याला मार लागून कानातून रक्त आले. यातच त्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी वाहनधारकांनी मोठी गर्दी केली होती. या भागात बागायतक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याचा अधिवास शेतीशिवारात आहे. साक्रीचे पशुधनविकास अधिकारी डॉ. श्याम कोळेकर, डॉ. हसंराज देवरे यांनी शवविच्छेदन केले. साक्रीचे वनपरिक्षेत्राधिकारी कैलास सोनवणे, वनपाल डी. आर. भामरे, पगारे, गोरख मासुळे, शेख वनरक्षक गणेश बोरसे, विजय राठोड, योगेश खलाणे, जेलेवाड, वनमजूर, अक्कलपाडा पोलिसपाटील भालचंद्र पाटील, इच्छापूर पोलिसपाटील दादाजी मारनर उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule devur road accicent bibtya death