esakal | स्वच्छतेत राज्यात नव्हे देशात चमकले, तरी सत्ताधारी नाराज !
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छतेत राज्यात नव्हे देशात चमकले, तरी सत्ताधारी नाराज !

देशात, राज्यात चमकावे एवढे धुळे शहर स्वच्छ आहे का असा प्रश्‍न अनेकजणांना पडला.

स्वच्छतेत राज्यात नव्हे देशात चमकले, तरी सत्ताधारी नाराज !

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये धुळे शहर राज्यात नव्हे तर देशात चमकले खरे पण स्वच्छतेप्रश्‍नी शहरात वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्याच काही नगरसेवकांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालावर आश्‍चर्य व्यक्त केले आहे. महापालिकेच्या ऑनलाइन स्थायी समिती सभेतही याचेच प्रतिबिंब उमटल्याचे पाहायला मिळाले. आमच्या प्रभागात १२ दिवस झाले घंटागाडी फिरकलेली नाही, घाणीचे साम्राज्य पसरले आहे अशा तक्रारी सत्ताधारी सदस्यांनीच केल्या, त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या निकालावर महापालिकेने हुरळून जाण्याचे कारण नाही असेच म्हणावे लागेल. 

स्वच्छ सर्वेक्षण-२०२० मध्ये धुळे शहराने शंभराव्या स्थानावरून थेट देशात नवव्या तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे देशभरात, राज्यात नाव चमकले. महापालिकेचे कारभारी व प्रशासन तसेच धुळेकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मात्र, या निकालाबाबत अनेकजणांना आश्‍चर्यही वाटले. देशात, राज्यात चमकावे एवढे धुळे शहर स्वच्छ आहे का असा प्रश्‍न अनेकजणांना पडला. गुरुवारी (ता.२७) महापालिकेच्या स्थायी समिती सभेतही याचेच प्रतिबिंब पाहायला मिळाला. 

घंटागाडीचा पत्ता नाही 
स्थायी समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य युवराज पाटील यांनी आपल्या प्रभागात (प्रभाग क्रमांक-१४) १२ दिवस झाले घंटागाडी आलेली नाही, प्रभागात मोठ्या प्रमाणावर कचरा आहे. नागरिक फोन करून तक्रारी करत आहेत. अधिकाऱ्यांना याबाबत सांगावे तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात, प्रश्‍न मार्गी लागत नाही. सदस्य अमोल मासुळे यांनीही हाच मुद्दा पकडून माझ्याही प्रभागात कचरा संकलनाची समस्या आहे. घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रशासन मात्र गांभीर्याने घेत नाही असे सांगितले. वास्तविक गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेने शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवायला हवी होती. मात्र, तसे झाले नाही, आता तरी ते करा अशी मागणी त्यांनी केली. 

सभापतींकडून पुन्हा इशारा 
सदस्यांच्या तक्रारींवर सभापती सुनील बैसाणे यांनी आयुक्तांनी आढावा घेतला असून आरोग्य यंत्रणेला घंटागाडी व स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा केल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. त्यामुळे कुणाच्या स्वच्छता, घंटागाडीबाबत तक्रारी असतील तर त्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. कामात कुणी हलगर्जीपणा केला, दोषी आढळला तर रीतसर कारवाई केली जाईल असा इशारा दिला. आयुक्त, सभापतींच्या या इशाऱयानंतरही घंटागाडी, अस्वच्छतेच्या तक्रारी किती सुटतात याकडे आता लक्ष असेल. 


जेवणाबाबत ठेकेदाराची चूक 
महापालिकेच्या पॉलिटेक्नीकमधील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर जेवण मिळाली नसल्याचा प्रश्‍न सदस्य नंदू सोनार, श्री. मासुळे यांनी मांडला. त्यावर भांडारपाल राजेंद्र माईनकर, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी असा प्रकार पहिल्यांचा घडला असून यात महापालिकेच्या यंत्रणेची नव्हे तर ठेकेदाराची चूक असल्याचे सांगितले. यापुढे अशी तक्रार येणार नाही याची काळजी घेतली जाईल असेही डॉ. म्हणाले. 
 
संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top