धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणूक; पटेल-पाटील यांच्यात रंगतदार सामना 

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणूक; पटेल-पाटील यांच्यात रंगतदार सामना 

धुळे : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पूर्वी स्थगित झालेल्या विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा बिगुल पुन्हा मंगळवारी (ता. १७) वाजला. यात माजी शालेय शिक्षणमंत्री तथा काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेशीत अमरिशभाई पटेल आणि महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांच्यात दुरंगी सामना रंगेल. त्यांचे भवितव्य १ डिसेंबरला मतदान पेटीत बंद होईल आणि ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर विजयाचा फैसला होईल. 

सर्वप्रथम धुळे-नंदुरबार विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी ५ मार्चला अधिसूचना प्रसिद्ध झाली. १२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले गेले. तसेच ३० मार्चला मतदान होणार होते. मात्र, कोरोनामुळे २५ मार्चला कार्यक्रम स्थगितीसह ही निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय झाला. स्थगिती उठल्याने आता जाहीर झालेल्या पुढील पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार १ डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणीसह निकाल जाहीर होईल. 

निवडणुकीचे वैशिष्ट्ये 

माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार मतदारसंघाची जागा रिक्त झाली. पोटनिवडणूक जाहीर होताना ती बिनविरोध करण्याचा पटेल यांच्यासह भाजपचा प्रयत्न होता. मात्र, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे शहादा (जि. नंदुरबार) येथील उमेदवार अभिजित पाटील यांनी रिंगणात उडी घेतली. दोन्ही उमेदवारांनी १२ मार्चच्या छाननी प्रक्रियेपूर्वी नामनिर्देशन अर्ज भरल्याने दुरंगी सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, वडील शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील हे भाजपत, तर मुलगा अभिजित पाटील हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाआघाडीचे उमेदवार असल्याने निवडणुकीत रंगत वाढली आहे. 

दहा मतदान केंद्रे निश्‍चित 
केंद्रीय निवडणूक आयोगाने कोविडच्या स्थितीत निवडणूक हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यात धुळे, नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, डॉ. रघुनाथ भोये यांची आरोग्य समन्वयक अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालय मिळून दहा मतदान केंद्रे निश्‍चित झाली आहेत. त्या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क, ताप तपासणीसाठी थर्मल गन असेल. प्रत्येक केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती असेल. ज्या मतदाराकडे मास्क नसेल त्याला ते केंद्राकडून पुरविले जाईल. थर्मल स्क्रीनिंगमध्ये ताप असलेला मतदार आढळला तर त्याला विशिष्ट वेळी आणि सर्वांत शेवटी मतदानाची संधी दिली जाईल. 

एकूण ४३७ मतदार 
धुळे महापालिकेतील लोकसंग्राम संघटनेच्या सदस्या हेमा अनिल गोटे व शिंदखेडा नगर परिषदेतील भाजपचे स्वीकृत सदस्य राजेंद्र भामरे यांनी राजीनामा दिला आहे. धुळे महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य सोनल शिंदे यांना निवडणूक खर्च सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या ४३७ झाली. यात भाजपचे १९९, काँग्रेसचे १५७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे २०, एमआयएमचे नऊ, समाजवादी पक्षाचे चार, बसप एक, मनसे एक आणि अपक्ष दहा सदस्यांचा समावेश आहे. 

 दोन जिल्ह्यांतील मतदार 
निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदार असे ः धुळे जिल्हा परिषद- ६०, धुळे महापालिका- ७७, साक्री नगरपंचायत- १९, शिरपूर नगर परिषद- ३४, दोंडाईचा नगर परिषद- २८, शिंदखेडा नगरपंचायत- १९, नंदुरबार जिल्हा परिषद- ६२, नंदुरबार पालिका- ४४, नवापूर पालिका- २३, शहादा पालिका- ३१, अक्राणी नगरपंचायत- १९, तळोदा पालिका- २१. एकूण- ४३७. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com