esakal | जिल्हा बॅंकेची पीककर्ज वाटपात आघाडी 
sakal

बोलून बातमी शोधा

pikkarj

दोन्ही जिल्ह्यांत 11 मेपर्यंत 10 हजार 393 शेतकरी सभासदांना 85 कोटी 86 लाख 89 हजारांचे कर्जवाटप केले, अशी माहिती बॅंकेचे शेती व बिनशेती विभागाचे व्यवस्थापक जी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली.

जिल्हा बॅंकेची पीककर्ज वाटपात आघाडी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने खरीप पीककर्ज वाटपात धुळे व नंदुरबार दोन्ही जिल्ह्यांत आघाडी घेतली आहे. सर्व प्राथमिक, आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना वैयक्‍तिक, केसीसी पीक कर्ज घेणाऱ्या सभासदांना 15 एप्रिलपासून खरीप पीक कर्ज वाटपात प्रारंभ केला. त्यानुसार दोन्ही जिल्ह्यांत 11 मेपर्यंत 10 हजार 393 शेतकरी सभासदांना 85 कोटी 86 लाख 89 हजारांचे कर्जवाटप केले, अशी माहिती बॅंकेचे शेती व बिनशेती विभागाचे व्यवस्थापक जी. एन. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. 

"कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर राज्य व स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन करून प्रत्येक शाखेत सॅनिटायझरचा व मास्कचा वापर करून फिजिकल डिस्टन्सचे पालन करत बॅंकेने रुपे केसीसी क्रेडीट कार्डद्वारे संपूर्ण कर्जवाटप केले. त्यात धुळ्यात 7 हजार सातशे 17 सभासदांना 58 कोटी 12 लाख 29 हजार, तर नंदुरबार जिल्ह्यातील दोन हजार सहाशे 75 सभासदांना 27 कोटी 74 लाख 60 हजारांचे वाटप करण्यात आले. बॅंकेने कर्जवाटपासाठी नाबार्डच्या अर्थसहाय्याने मोबाईल एटीएम व्हॅन बेटावद, वर्षी, कौठळ, शेवाळी, होळ, नरडाणा, पाष्टे, बोरकुंड या गावांना उपलब्ध करून दिली. मोबाईल व्हॅनद्वारे आतापर्यंत 850 सभासदांना एक कोटी 30 लाखांचे पीक कर्ज रोखीने उपलब्ध करून दिले. मोबाईल एटीएम व्हॅन गावातील मोकळ्या मैदानात उभी करून प्रत्येक शेतकरी सभासदाचे फिजिकल डिस्टन्स ठेवून सॅनिटाइज करून इन्फ्रारेड थर्मामीटर मशीनने शेतकऱ्यांचे तापमान मोजून व्हॅनमध्ये प्रवेश दिला. प्रत्येक सभासदांनतर व्हॅन स्वच्छ करण्यात येत आहे. पीककर्ज वाटप करताना केंद्र शासनाने पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पीक विमा कर्जदार सभासदांसाठी ऐच्छिक केला आहे. त्यासाठी जिल्हा बॅंकेच्या प्रत्येक शाखेत पीक विमा घ्यावयाचा नसल्यास लाल व पिक विमा घ्यावयाचा असल्यास पांढरा फॉर्म उपलब्ध करून दिला आहे. शेतकरी सभासदांनी इच्छेनुसार फॉर्म भरून संबंधित शाखेत तपासनीस किंवा शाखाधिकाऱ्याकडे जमा करावयाचा आहे. 

शून्य टक्के व्याजाचा लाभ घ्या 
जिल्हा बॅंकेने सर्व प्रकारची दक्षता व सुविधावर भर देत पीक कर्ज वाटपात अन्य सर्व बॅंकांपेक्षा घेतलेली आघाडी लक्षात घेता सर्व शेतकरी सभासदांनी त्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीक कर्जाची रिझर्व्ह बॅंकेने दिलेल्या परतफेडीच्या वाढीव मुदत 31 मेपर्यंत भरणा करून शून्य टक्के व्याजदराचा लाभ घ्यावा व नवीन पीक कर्ज दरानुसार कर्ज घेण्यास पात्र व्हावे, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांनी केले आहे. अशी माहिती शेती व बिनशेती विभागाचे व्यवस्थाचक जी. एन. पाटील यांनी दिली.