"युद्ध' कोरोनाप्रमाणेच अपुऱ्या मनुष्यबळाशीही! 

निखिल सूर्यवंशी
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोना'प्रमाणे अपुऱ्या मनुष्यबळाशीही युद्ध करावे लागत आहे. त्यावर मात करत आणि सात दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यंत्रणेतील उणिवा, त्रुटी भरून काढत, कारभाराला दिशा देत "कोरोना'शी लढा सुरू ठेवला आहे.

धुळे  जिल्ह्याला संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ने विळखा घालण्यास सुरवात केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अमुक केले पाहिजे, तमुक केले पाहिजे... असा सूर जनमानसातून उमटताना दिसतो. परंतु, त्यांच्यापुढील यंत्रणेच्या अडचणी आणि त्यातील प्रत्येकाच्या वागणुकीची तऱ्हा, डोक्‍यावरील अपेक्षांचा डोंगर पाहता जिल्हाधिकारी यंत्रणेचा दुवा ठरत असले, तरी त्यांना "कोरोना'प्रमाणे अपुऱ्या मनुष्यबळाशीही युद्ध करावे लागत आहे. त्यावर मात करत आणि सात दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी संजय यादव यांनी यंत्रणेतील उणिवा, त्रुटी भरून काढत, कारभाराला दिशा देत "कोरोना'शी लढा सुरू ठेवला आहे. 
धक्कादायक म्हणजे पदभार घेतल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण समितीची बैठकच झाली नसल्याचे, "कोरोना'शी लढ्याचा कृती आराखडा तयार नसल्याची माहिती श्री. यादव यांना मिळाली. मात्र, संयमी भूमिका घेत आणि दोष- दूषणे न देता आपण यंत्रणेच्या सोबतीने काय करू शकतो, वेळ अजूनही हातात आहे, असे मानून त्यांनी कामकाजाला सुरवात केली. तोपर्यंत शेजारचे जळगाव, मालेगाव, सेंधवा कोरोनाबाधित झाले होते. ते लक्षात घेऊन इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या सोबतीने सर्व यंत्रणेचा "दुवा' ठरणारे श्री. यादव यांनी कुठलाही वेळ न दवडता "कोरोना'शी मुकाबल्याचा कृती आराखडा तयार केला. 
 
"गॅप' भरण्यास सुरवात 
जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध यंत्रणांतील "कम्युनिकेशन' व विविध स्वरूपाचा "गॅप' भरण्यास सुरवात केली. रोज सायंकाळी सहाला ते "कोरोना'च्या लढ्यात सहभागी प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडविणे, मागण्यांची पूर्तता करून लढ्याला बळ देणे, योद्‌ध्यांमध्ये आत्मविश्‍वासाची पेरणी करणे आणि "टीम वर्क'च्या माध्यमातून "कोरोना'ला रोखून जनतेला सुरक्षितता प्रदान करण्यावर श्री. यादव भर देत आहेत. यातील निरनिराळ्या यंत्रणांत प्रसंगानुसार काही उणिवा, त्रुटी राहत असतील त्या दूर करण्यासाठीही श्री. यादव तत्काळ निर्णयावर भर देत असल्याचे निरीक्षणातून दिसून येते. 

विविध उपाययोजनांवर लक्ष 
या पार्श्‍वभूमीवर "सकाळ'शी बोलताना जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की सात दिवसांपूर्वी पदभार घेतल्यापासून "कोरोना' आणि पाणीटंचाईच्या समस्येवर लक्ष केंद्रित केले आहे. नागपूरहून धुळ्यात येताना अनेक जण "मास्क' वापरत नसल्याचे, अकारण हिंडत असल्याचे दिसून आले. ही गंभीर स्थिती ओळखून कामकाज सुरू केले. "ग्रीन झोन'चा बुरखा पांघरणे धोकादायक ठरेल, असे मानून यथोचित उपाययोजना सुरू केल्या. 

"कोरोना'ला रोखण्यासाठी हे महत्त्वाचे... 
- रुग्णालय, पोलिस, प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांचे "टीम वर्क' 
- कोरोनाग्रस्त आणि त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करणे 
- नागरिकांनी स्वतःबरोबरच इतरांची काळजी घ्यावी 
- सामाजिक अंतराचे (सोशल डिस्टन्सिंग) पालन करणे 
- शास्त्रोक्त वैद्यकीय उपचारांबरोबरच संवादातून धीर देणेही तितकेच महत्त्वाचे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule district corona no staff health