चार शिक्षक धुळे जिल्ह्यात पॉझिटिव्ह 

निखिल सूर्यवंशी
Sunday, 22 November 2020

गर्दीद्वारे सरकारच्या शारीरिक अंतराच्या नियमांचे कोरोना चाचणीच्या नावाखाली उल्लंघन केले. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही भार पडला. शहरासह जिल्ह्यातून आतापर्यंत चार हजार ८५ शिक्षकांनी कोरोनाची चाचणी केली.

धुळे : राज्य सरकारने अटी-शर्तींनुसार सोमवार (ता.२३)पासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तत्पूर्वी या वर्गांच्या शिक्षकांनी कोरोना चाचणी करावी, असे आदेश आहेत. मात्र, शहरासह जिल्ह्यात १८ नोव्हेंबरपासून शिक्षकांनी चाचणीसाठी नियमांचे उल्लंघन करत गर्दी केली. यात चार शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी शनिवारी (ता. २१) दिली. 
नववी ते बारावीच्या वर्गांसह अकारण इतर वर्गाच्या शिक्षकांनीही घुसखोरी करत, गर्दीद्वारे सरकारच्या शारीरिक अंतराच्या नियमांचे कोरोना चाचणीच्या नावाखाली उल्लंघन केले. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवरही भार पडला. शहरासह जिल्ह्यातून आतापर्यंत चार हजार ८५ शिक्षकांनी कोरोनाची चाचणी केली. पैकी शनिवारी प्राप्त पहिल्या तपासणी अहवालानुसार धुळे शहर, बोरीस (ता. धुळे), पिंपळनेर (ता. साक्री) आणि भाडणे- साक्री कोविड सेंटरमध्ये नमुने देणारा एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यांची सविस्तर माहिती संकलनाचे काम सायंकाळनंतर सुरू झाले. 

आणखी शिक्षकांचे अहवाल येणे बाकी
सोमवारी शाळांसह नववी ते बारावीचे वर्ग खुले करण्याचे सरकारचे आदेश असले तरी प्रशासकीय आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगत अनेक शालेय व्यवस्थापनांनी संबंधित वर्ग सॅनिटाइझ करायला सुरवात केली. चार हजार शिक्षकांनी कोरोना चाचणी केल्यानंतर चार जण पॉझिटिव्ह आढळले. उर्वरित शिक्षकांचे अहवाल प्रतीक्षेत असताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवरच राहील. त्यासाठी सोमवारी नेमके काय चित्र असेल, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

अशी झाली तपासणी... 
१७ नोव्हेंबर : १६ 
१८ नोव्हेंबर : ७४८ 
१९ नोव्हेंबर :१२१९ 
२० नोव्हेंबर : १३७४ 
२१ नोव्हेंबर : ७८० 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule district four teacher corona positive