esakal | धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’ !

धुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’ !

sakal_logo
By
सकाळ वृ्त्तसेवा

कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’

धुळे: वाढत्या कोरोना (corona)संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधांमुळे (strict restrictions) जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीला ‘ब्रेक’ (Break) लागत आहे. सलग दीड ते दोन महिने झपाट्याने उंचावलेला कोरोना रुग्णसंख्येचा आलेख मेच्या मध्यावर काहीअंशी खाली आला आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्‍या दैनंदिन रुग्णसंख्येत १४.३१ टक्क्यांनी घट झाली असून, रविवारी जिल्ह्यात २३४ जण कोरोनामुक्त (corona free) झाले. शिवाय कुणाचाही मृत्यू झाला नाही. त्यामुळे हा दिलासा देणारा दिवस ठरला. जिल्ह्यात आतापर्यंत ६५८ हून अधिक जणांचा बळी गेला आहे.


(dhule district strict restrictions corona patients break)

हेही वाचा: धुळ्यात वादळी वाऱ्‍यासह मुसळधार पावसाची हजेरी

कोरोनाची दुसरी लाट शहरापाठोपाठ ग्रामीण भागात झपाट्याने पसरली. वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य व्यवस्था डळमळीत झाली. प्राणवायू, रेमडेसिव्हिरसह अन्य औषधांच्या तुटवड्यालाही नागरिकांना तोंड द्यावे लागले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने प्रथम अंशत: लॉकडाउन लागू झाला. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या आटोक्यात आली. मात्र, विनाकारण घराबाहेर पडलेल्या नागरिकांमुळे संक्रमितांची आकडेवारी वाढली. अखेर प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले. याचे दृश्य परिणाम सद्यःस्थितीत जाणवत आहेत. नव्याने आढळणाऱ्‍या रुग्णांची संख्या कमी होत आहे. शिवाय नवीन रुग्णांच्या तुलनेत उपचाराअंती बरे होणाऱ्‍यांचे प्रमाणही वाढले आहे. आरोग्य यंत्रणेने वाढवलेली लसीकरणाची गती हेसुद्धा यामागील एक प्रमुख कारण आहे.


९ ते १५ एप्रिल हा लॉकडाउनपूर्वीचा सप्ताह आणि ८ ते १४ मे हा अलीकडेच संपलेला आठवडा याचा तुलनात्मक अभ्यास केला असता जिल्ह्यात आढळणाऱ्‍या दैनंदिन रुग्णसंख्येत १४.३१ टक्क्यांनी घट झाली आहे. १ ते ७ मेपर्यंत हे प्रमाण २९.८९ टक्के राहिले. गेल्या १४ दिवसांत साक्री तालुक्यातील एक हजार ११७, धुळे ७८४, शिंदखेडा ६१६, तर शिरपूर तालुक्यातील ३०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात रविवारपर्यंत (ता. १६) तीन लाख ८९ हजार जण कोरोनामुक्त झाले आहेत.


शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ८.८५ टक्के
महापालिकेची शहरात बारा रुग्णालये आहेत. प्रत्येक दवाखान्यात रोज शंभर ॲन्टिजेन तपासण्या केल्या जात आहेत. मार्च ते मे महिन्यादरम्यान १८ हजार ८८६ आरटीपीसीआर व ६० हजार २६९ ॲन्टिजेन तपासण्या झाल्या. याच कालावधीत ७९ हजार १५५ जणांची कोरोना तपासणी झाली. त्यातून सात हजार १२ बाधित आढळले. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ८.८५ टक्के आहे.

हेही वाचा: कोरोनात टायफॉइडची टेस्टही येते पॉझिटिव्ह

सर्वाधिक घट नंदुरबार जिल्ह्यात
खानदेशात सर्वाधिक ६९.९० टक्के घट नंदुरबार जिल्ह्यात झाली. जळगाव जिल्ह्यात २६.८० टक्के रुग्णसंख्या कमी झाली आहे. धुळे जिल्ह्यात १ ते ७ मेदरम्यान सरासरी दैनंदिन रुग्णसंख्येत २९.८९ टक्के घट झाली. मात्र, त्यानंतर ८ ते १४ मे या कालावधीत हाच आकडा सरासरी रोज ३१० संख्येत राहिला.

loading image
go to top