दिपोत्‍सव..धुळे जिल्ह्यात दोनशे कोटींवर उलाढाल 

diwali utsav market
diwali utsav market

धुळे : सात महिन्यांपासून संसर्गजन्य कोरोना विषाणूच्या धाकात संयमाने वर्तन राखणाऱ्या धुळेकरांनी यंदा दिवाळीची संधी साधत येथील मुख्य बाजारपेठेत ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी केली. अमाप उत्साहामुळे पेठ भागात चालणेही मुश्‍कील झाले होते. या वातावरणामुळे निरनिराळ्या व्यावसायिकांमध्ये ‘फीलगुड’ दिसून आले. दिवाळीनिमित्तच्या दोन ते तीन दिवसांत धुळे शहरात सुमारे शंभर कोटींवर, तर शहरासह जिल्ह्यात एकूण सुमारे दोनशे कोटींवर उलाढाल झाल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग यांनी दिली. 

रेकॉर्ड ब्रेक गर्दी
जिल्ह्यात २२ मार्चनंतर कोरोनामुळे लॉकडाउन सुरू झाले. ५ जूननंतर आतापर्यंत टप्प्याटप्प्याने लॉकडाउन शिथिल होत आहे. असे सात महिने धुळेकरांनी संयम राखला. त्यातील उमाळा दिवाळी सणानिमित्त येथील आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेसह पेठ भागात ‘रेकॉर्ड ब्रेक’ स्वरूपात दिसून आला. विविध वस्तू खरेदीसाठी धुळेकरांनी तोबा गर्दी केली. त्यामुळे खाद्यपदार्थ, कपडे, मोबाईल, दागदागिने, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींपासून फ्लॅट बुकिंग, खरेदीपर्यंत दिसून आला. दिवाळीत खरेदीबाबत कुठलीही कसर नागरिकांनी सोडली नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये ‘फीलगुड’चे वातावरण दिसले. नागरिकांनी कोरोनासंबंधी नियमांचे पालन करावे म्हणून महापालिकेचे पथक, पोलिस सतर्क होते. तसेच व्यापाऱ्यांनीही ग्राहकांसाठी ‘नो मास्क, नो एन्ट्री’ अभियान राबवून प्रशासनाला साथ दिली. 

दिवाळीने अर्थचक्र रुळावर 
कोरोनाची भीती काहीशी बाजूला ठेवत धुळेकरांनी दिवाळीचा आनंद लुटल्याचे दिसले. लक्ष्मीपूजनापूर्वीच श्री लक्ष्मी व्यापारी, व्यावसायिकांवर प्रसन्न झाली. त्यामुळे शनिवारी (ता. १४) लक्ष्मीपूजनाचा आनंद द्विगुणित झाला. कोरोनाच्या संकटकाळातील मरगळ दिवाळीने झटकून काढली. दिवाळीनिमित्त चाकरमान्यांमध्ये वेतन, अग्रिम रक्कम, बोनसमुळे खरेदीचा उत्साह दिसून आला. या सणामुळे अर्थचक्र रुळावर येत असल्याची प्रचीती आली. विविध वाहनांच्या खरेदीत तर अनेक ग्राहक वेटिंगवर असल्याचे सांगण्यात आले. सोने बाजाराला झळाळी आली. कापड उद्योगात मोठी उलाढाल झाली आहे. यात आतषबाजीच्या व्यवसायात काहीशी मंदी जाणवली. दिवाळीच्या फराळाला मोठी मागणी दिसली. अनेक कॉलन्यांमध्ये आचारी वर्ग स्टॉलद्वारे फराळ तयार करून देत आहेत. मात्र, काहीशा महागाईमुळे सोयाबीनचे खाद्यतेल प्रतिकिलो ८० वरून थेट ११० ते ११५ रुपयांवर, तर डाळींचे दर वाढले. 
 
दिवाळीसारखा सण आला की पंधरा दिवस गर्दी होते. हातात पैसा खेळतो. त्याचा फायदा खरेदीसाठी होतो. कोरोनामुळे सहा ते सात महिने नागरिकांनी संयम बाळगला. दिवाळीमुळे त्यांनी उत्साह द्विगुणित करत खरेदीची संधी साधली. सहा ते सात महिन्यांचा ‘गॅप’ दिवाळीत भरून काढल्याने बाजारपेठेत ‘फीलगुड’चे वातावरण दिसते आहे. तरीही सर्वांनी कोरोनाबाबत शासन, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असा आग्रह आहे. 
-नितीन बंग, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com