डॉक्‍टर, अभियंत्यांनी साकारले "पोर्टेबल व्हेंटिलेटर' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 एप्रिल 2020

कोविड-19 च्या रुग्णांना शेवटच्या टप्प्यावर फुफ्फुसे निकामी झाल्यावर व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासते. सद्यःस्थितीत जगभरात व्हेंटिलेटरची कमतरता आहे. हीच गरज ओळखून पाटील- नेवे यांनी पोर्टेबल व्हेंटिलेटरची निर्मिती केली.

धुळे : "कोरोना'शी दोन हात करण्यासाठी येथील प्रथितयश डॉ. आशिष पाटील व नाशिकस्थित इलेक्‍ट्रॉनिक्‍स अभियंता किरण नेवे सरसावले आहेत. डॉ. पाटील, नेवे या जोडीगोळीने "पोर्टेबल व्हेंटिलेटर'चे संशोधन व निर्मिती करून वैद्यकीय क्षेत्राला सुखद धक्का दिला आहे. 

हेही पहा - शिरुडच्या "कोरोना' रुग्णाच्या संपर्कातील बारा जणांना जळगावला रवानगी 

कोविड-19 च्या रुग्णांना शेवटच्या टप्प्यावर फुफ्फुसे निकामी झाल्यावर व्हेंटिलेटरची आवश्‍यकता भासते. सद्यःस्थितीत जगभरात व्हेंटिलेटरची कमतरता आहे. हीच गरज ओळखून पाटील- नेवे यांनी पोर्टेबल व्हेंटिलेटरची निर्मिती केली. उत्तर महाराष्ट्रातील हे पहिलेच संशोधन असून, "लॉक डाउन'चा कालावधी सत्कर्मी लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

सद्यःस्थितीत उपलब्ध व्हेंटिलेटर महाग, तसेच त्याला लागणारे प्रेशराईज गॅस, कॉम्प्रेसर निसजन सिलिंडर आणि वीज आदी वस्तूंची आवश्‍यकता असते. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करत या जोडीकडून संशोधित व्हेंटिलेटरला इतर कोणत्याही वस्तूंची गरज भासत नाही, हे विशेष. तसेच सध्याच्या व्हेंटिलेटरच्या तुलनेत पाच ते सहापट स्वस्तही असणार आहे. संशोधित व्हेंटिलेटर विनागॅस, विना निसजन सिलिंडर तसेच विनावीज (एसी सप्लाय) म्हणजे कारच्या बारा व्होल्टच्या बॅटरीवरही चालू शकेल. 

ग्रामीण भागातील वीज समस्या आणि रुग्णांना कमी खर्चात लवकर कसे बरे करता येईल, या उद्देशातून हा आविष्कार करण्यात आला. विजेबरोबर गॅस, निसजन सिलिंडर आदी वस्तू उपलब्ध नसतात, अशा ठिकाणीही हे व्हेंटिलेटर काम करेल. व्हेंटिलेटरचे नमुना उपकरण (प्रोटोटाइप) तयार असून त्याचे कृत्रिम फुफ्फुसांवर प्रयोग सफल झाल्याचेही पाटील व नेवे यांनी सांगितले. भारतात लाखों व्हेंटिलेटरची आवश्‍यकता आहे. विश्‍व आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बहुसंख्य आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्हेंटिलेटर कोणत्या देशाला उपलब्ध करून द्यावे यावर नियंत्रण आणले आहे. त्यामुळे भारताला व्हेंटिलेटर मिळणे दुरापास्त होणार आहे. त्यामुळे डॉ. पाटील आणि अभियंता नेवे यांच्या संशोधनाला महत्त्व आहे. त्यांच्या तीन संशोधनांना पेटंट मिळाले असून ही किमया साधणारे ते देशातील एकमेव डॉक्‍टर आहेत. त्यांना विविध पुरस्कार व विक्रम नावावर नोंदले आहेत. 

कार व्होल्टवरील व्हेंटिलेटर... 
नवीन संशोधित व्हेंटिलेटर इतर कोणत्याही उपकरणाची आवश्‍यकता नसल्याचे ते अगदी कारच्या बारा व्होल्ट डीसी पॉवरवर सुरू होऊन तातडीच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ज्याप्रमाणे शुद्ध पाण्यासाठी आरओ आहेत. त्याप्रमाणे आवश्‍यकता असलेल्या रुग्णांच्या घरात व्हेंटिलेटर दिसू शकतील. दम्याच्या रुग्णांसाठी ते उपयुक्त ठरेल, असे डॉ. पाटील, अभियंता नेवे यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule doctor engeenier dreat portebale ventileter