esakal | Video : अमृततुल्य खेळ... डोंबाऱ्यांच्या पात्रात चिल्लर 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule bombari

दारिद्य्र रेषेखाली असल्याचा इतर पुरावा त्यांच्याकडे नाही. अनेक शासकीय योजना गरींबासाठी असतात. परंतु योजनाच माहीत नसल्याने तसेच पुरेशा कागदपत्रांअभावी त्यांच्यापर्यंत योजनाच पोचत नाहीत. अन्नसुरक्षा योजनेतून धान्य, घरकुल, आरोग्य अशा अनेक मूलभूत योजनांपासून भटके तसेच अशिक्षित कुटुंब नेहमीच वंचित राहते.

Video : अमृततुल्य खेळ... डोंबाऱ्यांच्या पात्रात चिल्लर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याशेजारी गाणे लागले होते. रहनेको घर नही, सोने को बिस्तर नही. दोरीवर सुमारे 10 वर्षाची मुलगी काठी हातात घेऊन चालत होती. आपली मुलगी 10 फुटांवरून पडणार तर नाही ना, या चिंतेतच कोणी पैसे देते का याची टेहेळणी करत तिची आई शेजारी बसली होती. परंतु रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना हा अमृततुल्य खेळ बघावासा वाटला नाही. शेवटी मिळालेली चिल्लर गोळा करीत कुटुंबाने घरचा रस्ता धरला. 

मूळचे छत्तीसगड येथील डोंबाऱ्यांचे नट कुटुंब मोहाडी उपनगरात वास्तव्यास आहे. हे कुटुंब मिळेल ते काम करून आपली गुजराण करते. आज (ता. 1) दुपारी बाराच्या सुमारास या कुटुंबाने जुन्या महापालिकेसमोरील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या बाजूलाच रस्त्यावर खेळ मांडला होता. दोन्ही बाजूस लाकडी दांड्यांची तिवई उभी करून मधल्या अंतरात सुमारे 10 फूट उंचीवर दोरी बांधली होती. या दोरीवर दहा ते अकरा वर्षांची मुलगी हातात काठी घेऊन आपला तोल सांभाळीत चालत होती. खाली तिचा 14-15 वर्षाचा भाऊ टेपरेकॉर्डरवर गाणी बदलत लोकांचे चित्त आकर्षण करत होता. दोन्ही मुलांची आई मुलीचा खेळ पाहत होती. आपली मुलगी पडणार तर नाही ना, याची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. दुसरीकडे आपल्या पात्रात लोकांनी पैसे टाकावेत, या आशेने आजूबाजूला हॉटेल, चहाची टपरी व रस्त्यावरील लोकांकडे बघत होती. लोक चहाचा घोट घेतच खेळाचा आनंद लुटत होते. रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक त्या मुलीकडे एक कटाक्ष टाकत पुढे जात होते. मात्र जगण्यासाठी धोकादायक परिस्थितीत खेळ करणाऱ्या या मुलीच्या कलेला दाद द्यायला कोणाकडे वेळ नव्हता. सुमारे अर्धा तास खेळ केल्यानंतर फक्‍त दहा रुपये मागणाऱ्या या कुटुंबाच्या पात्रात काही चिल्लर जमा झाली. मुलीला भजी खाऊ घालत या आईने सामान आवरत घरचा रस्ता धरला. 

योजना पोचल्याच नाहीत 
छत्तीसगडधून आलेल्या या कुटुंबाकडे रेशनकार्ड व आधारकार्ड आहे. दारिद्य्र रेषेखाली असल्याचा इतर पुरावा त्यांच्याकडे नाही. अनेक शासकीय योजना गरींबासाठी असतात. परंतु योजनाच माहीत नसल्याने तसेच पुरेशा कागदपत्रांअभावी त्यांच्यापर्यंत योजनाच पोचत नाहीत. अन्नसुरक्षा योजनेतून धान्य, घरकुल, आरोग्य अशा अनेक मूलभूत योजनांपासून भटके तसेच अशिक्षित कुटुंब नेहमीच वंचित राहते. त्यात कुटुंबसंख्या कमी असेल व ते एकत्र वास्तव्यास नसतील तर बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते. गरिबांसाठी असलेल्या योजनांचा लाभ मात्र दारिद्य्राच्या निकषात न बसणाऱ्या मध्यमवर्गीयांनाच मिळत असल्याचे चित्र समाजात पहायला मिळते. 

आयुष्यमान भारत क्‍या होता है 
दारिद्य्र रेषेखाली जीवन जगणाऱ्या कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दिले जाते. परंतु सन 2011 मधील सामाजिक, आर्थिक, जातीनिहाय सर्वेक्षण गुप्त व चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे खऱ्या गरजू कुटुंबांना योजनांचा लाभ मिळत नाही. तर निकषात न बसणाऱ्या लोकांना कार्ड मिळाले आहेत. ही योजनाच माहीत नसल्याची प्रतिक्रिया अर्जुन नट यांनी सकाळकडे दिली.