esakal | एकीकडे कोविडचे ‘टेन्शन’ असताना रुग्णालयात घडला असा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

covid hospital attack

दोंडाईचात कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. एकमेव दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय धैर्याने या स्थितीशी मुकाबला करत आहे. रुग्णांना दाखल करून घेत आहे. त्यातच या रुग्णालयात सकाळी साडेदहानंतर विषप्राशनाचा रुग्ण उपचारासाठी आला. त्याच्या शरीरातील विष काढण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी सुरू केला.

एकीकडे कोविडचे ‘टेन्शन’ असताना रुग्णालयात घडला असा प्रकार

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : कोविडशी मुकाबला करणाऱ्या दोंडाईचा (ता. शिंदखेडा) उपजिल्हा रुग्णालयासह डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या व रुग्णालयात धुडगूस घालून काच फोडणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दोंडाईचातील सोशल मीडियावर तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी दोंडाईचाकरांनी केली आहे. या संतापजनक प्रकाराकडे जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा, दोंडाईचातील नेत्यांचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्‍न दोंडाईचात उपस्थित केला जात आहे. 

दोंडाईचात कोविडची रुग्णसंख्या वाढत आहे. एकमेव दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय धैर्याने या स्थितीशी मुकाबला करत आहे. रुग्णांना दाखल करून घेत आहे. त्यातच या रुग्णालयात सकाळी साडेदहानंतर विषप्राशनाचा रुग्ण उपचारासाठी आला. त्याच्या शरीरातील विष काढण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी सुरू केला. त्यासाठी नळीचा वापर झाला. संबंधित रुग्णाने तीन वेळेस ती नळी काढली. त्यामुळे डॉक्टरांनी नळी काढली, तर जिवाला धोका निर्माण होईल, ऐकणार नसेल तर धुळ्यात उपचारासाठी पाठवावे लागेल, अशी समज संबंधित रुग्णाला दिली. शिवाय अहोरात्र कोविडची रुग्णसेवा सुरू असताना संबंधित रुग्णाने वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे डॉक्टरांनी सांगितले. यात रुग्णाला धुळ्यात रेफर करण्याच्या मुद्यावरून शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी वाद घालण्यास सुरवात केल्याचे सांगण्यात आले. 

दोंडाईचात निषेध 
दोंडाईचा शहरात शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धुडगूस घातला, काच फोडली, रुग्णालयासह कर्मचारी, डॉ. प्रफुल्ल दुग्गड यांच्याशी वाद घालत हल्ला केल्याची माहिती वेगाने पसरली. या घटनेच्या निषेधाचे तीव्र पडसाद दोंडाईचातील सोशल मीडियावर उमटले. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची काम थांबविण्याची काही क्षण मनस्थिती होती. मात्र, कोविडचे गांभीर्य लक्षात ठेवत त्यांनी सेवा सुरू ठेवली. शिवाय संबंधित रुग्णांची प्रकृतीही ठीकठाक असून, तो धोक्याच्या बाहेर आहे. माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, डॉ. रवींद्र टोणगावकर, शैलेश दीक्षित, प्रवीण महाजन यांच्यासह अनेकांनी घटनेचा निषेध केला. दोंडाईचातून दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी झाली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांनी अनेकवेळा पोलिस बंदोबस्त मागितला. त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. त्यासाठी पाठपुरावा व्हावा. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे मनोबल वाढावे, त्यांना संकटकाळात सर्वांनी साथ द्यावी, गुंडगिरी खपवून घेऊ नये, असा सूर दोंडाईचातून उमटत आहे. 

घटनेची माहिती दिली नाही : नरोटे 
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांनी सांगितले, की रुग्णालयात वादाचा प्रकार, तोडफोड झाल्यासंबंधी माहिती त्या वेळी ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी मला दिलेली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही करता आलेली नाही. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image