दोंडाईचा घरकुल गैरव्यवहार : माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुखांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

धुळे ः दोंडाईचा नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज रात्री उशिरा पोलिसांकडून अटक झाली. त्यामुळे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

धुळे ः दोंडाईचा नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज रात्री उशिरा पोलिसांकडून अटक झाली. त्यामुळे जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 
दोंडाईचा पालिकेतर्फे एकात्मिक गृहनिर्माण योजनेंतर्गत 2008 ते 2015 या कालावधीत 77 कोटींच्या निधीतून सरासरी चार हजार घरकुलांना मंजुरी मिळाली. या प्रकरणी दलित आदिवासी मातंग समाज मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नगराळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना चौकशीचा आदेश होता. मात्र, चौकशीस विलंब लागल्याने नगराळे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने स्थानिक पोलिसांना चार आठवड्यांच्या आत गुन्हा दाखल करण्याची सूचना दिली होती. 
या पार्श्‍वभूमीवर 11 नोव्हेंबर 2016 ला गुन्हा दाखल झाला. त्यात दोंडाईचास्थित माजी राज्यमंत्री डॉ. देशमुख, तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र भास्कर देशमुख, विक्रम बळिराम पाटील, गुलाबसिंग सुरतसिंग सोनवणे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ, राजेंद्र व्ही. शिंदे, अमोल प्रभाकर बागूल यांचा समावेश होता. तपासाअंती संशयितांमध्ये वाढ झाली. पुढे माजी नगरसेवक गिरधारी रामराख्या, योजनेचा ठेकेदार संतोष जयस्वाल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नाजीम शेख यांचाही गुन्ह्यात समावेश झाला. अशा एकूण दहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. 
शासनाची फसवणूक, स्वतःच्या फायद्यासाठी योजनेत अपहार, गैरव्यवहार करणे, झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी योजना न राबविता गावाबाहेर योजना राबविणे, घरकुलांचे काम निकृष्ट दर्जाचे करणे, रेल्वेच्या हद्दीत घरकुल योजना राबविणे यासह विविध गंभीर आरोप या संशयितांवर ठेवण्यात आले. या प्रकरणी माजी नगरसेवक गिरधारी माधवदास रामराख्या यांना जानेवारी 2019 ला अटक झाली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात 29 जुलैला कामकाज होणार आहे. या प्रकरणात सुमारे 15 कोटींचा व्यवहार बॅंक खात्यावर झाल्याने, तसेच ते "हाय पॉवर' समितीचे सदस्य असल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली होती. 
या प्रकरणातील इतर संशयितांना अंतरिम जामीन मिळाला आहे. या गुन्ह्यात माजी मंत्री देशमुख यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. याविरोधात नगराळे यांनी जिल्हा न्यायालयात रिटपिटीशन दाखल केले होते. त्यावर जिल्हा न्यायालयात कामकाज सुरू होते. डॉ. देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी आज सायंकाळी साडेपाचला ताब्यात घेतले. नंतर वैद्यकीय तपासणी झाल्यावर रात्री उशिरा त्यांना अटक झाली. शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील देवेंद्र तवर यांनी, तर तक्रारदार नगराळे यांच्याकडून ऍड. नितीन दुसाने यांनी काम पाहिले. अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ तपास करीत आहेत. 
 
द्वेषापोटी गुन्हा दाखल ः देशमुख 
पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले गेल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. देशमुख म्हणाले, की दोंडाईचा घरकुल प्रकरणी रुपयाचा गैरव्यवहार झालेला नाही. राज्यात आदर्श घरकुल योजना म्हणून ती परिचित आहे. घरकुल योजनेतील अनियमितता प्रकरणी "कॅग'ने शासनाला अहवाल दिला होता. त्यात काही निष्पन्न झाले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी विरोधकांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायदेवतेवर विश्‍वास असून लवकरच या प्रकरणातून बाहेर पडेन. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule dondaicha gharkul dr hemant deshmukh arrest