esakal | आधारवर व्यक्‍तीला केले मोठे; सीएससी केंद्र सील
sakal

बोलून बातमी शोधा

duplicate aadhar card

वयाचा पुरावा म्हणून सादर केलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख १/१/१९४९ अशी नमूद होती, मात्र त्यांच्या मूळ आधार कार्डवर जन्मतारीख १/१/ १९७३ अशी आढळून आली. यावरून आधार कार्ड हे फोटोशॉप ऑनलाइन प्रणालीद्वारे बनावट तयार करून सीएससी केंद्र प्रणाली प्रकरणात सामील केले होते.

आधारवर व्यक्‍तीला केले मोठे; सीएससी केंद्र सील

sakal_logo
By
धनंजय सोनवणे


साक्री (धुळे) : शासनाच्या इंदिरा गांधी योजनेमध्ये पात्र होण्यासाठी बनावट आधार कार्डच्या साहाय्याने प्रकरण तयार करून देणाऱ्या शेतकी संघ येथे कार्यरत अमर सीएससी या केंद्रावर तहसीलदारांनी कारवाई करत केंद्र व तेथील दस्तऐवज सील केले. या सोबतच अन्य केंद्रांना देखील या बाबतीत नोटीस देण्यात आली असून बनावट दस्तावेज करणारे व जास्तीच्या पैशांची मागणी करणाऱ्या केंद्रांवर कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी दिला आहे. 

येथील तहसील कार्यालयात काही दिवसांपूर्वी कासारे येथील लुकमन पिंजारी यांनी इंदिरा गांधी योजनेत अर्ज केला होता. अर्ज त्यांनी अमर सीएससी केंद्र येथून ऑनलाइन प्रणालीद्वारे सादर केला होता. त्यामध्ये वयाचा पुरावा म्हणून सादर केलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख १/१/१९४९ अशी नमूद होती, मात्र त्यांच्या मूळ आधार कार्डवर जन्मतारीख १/१/ १९७३ अशी आढळून आली. यावरून आधार कार्ड हे फोटोशॉप ऑनलाइन प्रणालीद्वारे बनावट तयार करून सीएससी केंद्र प्रणाली प्रकरणात सामील केले होते. ऑनलाइन प्रकरण सादर करताना अर्जदाराचे मूळ दस्तावेज स्कॅन करून सादर करणे आवश्यक असताना जाणीवपूर्वक बनावट आधारकार्ड सादर करून बनावट वयाचा पुरावा निर्माण केल्याप्रकरणी अमर सीएससी केंद्रावर तहसील प्रशासनाकडून कारवाई करत सील केले. तहसीलदार प्रवीण चव्हाणके नायब तहसीलदार डॉ. ए. बी. असटकर यांनी ही कारवाई केली. 

बनावट दाखले देण्याचा प्रकार 
शहरात महा-ई-सेवा केंद्र तसेच सीएससी केंद्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत. यातील अनेक केंद्रांची नोंदणी ही खेड्यांमध्ये असताना हे केंद्र मात्र साक्री शहरात सुरू असल्याचे दिसून येते. या केंद्राभोवती एजंट देखील मोठ्या प्रमाणात राहत असून, अनेक प्रकरणांमध्ये जास्तीची रक्कम घेऊन तातडीने प्रकरण काढण्यासाठी हे एजंट कार्यरत असतात. तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट दाखले देण्याचा गंभीर प्रकार देखील या प्रकरणातून दिसून येत आहे. हे सर्व होत असताना केंद्राचे जिल्हा समन्वयक पडताळणीकडे तसेच कारवाईकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. प्रशासनाने सर्वच केंद्रांची पडताळणी करून असे प्रकार थांबवत अशी मागणी होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top