गावा-गावातल्या शेतांत  राबताहेत "इंजिनिअर मजूर' 

एल. बी. चौधरी
Monday, 8 June 2020

लाखो रुपये खर्चून वडिलांनी इंजिनिअरिंग केले. शासकीय नोकरी मिळाली नाही म्हणून खासगी क्षेत्रात कमी पगारावर काम केले. मोठ्या पॅकेजचे स्वप्न होते ते पूर्ण होण्यापूर्वीच कोरोनाने स्वप्नांचा चक्काचूर केला. जॉबच गेल्याने गावी परतावे लागले. आता शेतात काम करणे भाग पडत आहे. अनेक इंजिनिअर मित्र मिळेल ते काम करत आहेत. 
-शेख अजहर, सिव्हिल इंजिनिअर,सोनगीर 

 

सोनगीर (ता. धुळे) ः "मुलगा इंजिनिअर आहे... पुण्याला जॉब करतोय... सध्या पगार कमी असला तरी भविष्यात वाढेल मग काय...फ्लॅट, गाडी सगळ्या सुखसोई येतील आणि चांगला आयुष्य जाईल. वडिलांच्या या स्वप्नासह स्वतःचे आयुष्य घडविण्यासाठी पुण्यात गेलेला इंजिनिअर कोरोनाच्या संकटाने गावी परतलाय, नुसताच परतलेला नाही तर शेतात राबतोय. सोनगीर (ता. धुळे) येथील इंजियनियर युवकाची ही कहानी...पण ती एकट्याची नाही. अशा अनेक इंजिनिअर्सचे हात आज आपापल्या गावी शेती कामात गुंतले आहेत. 
 
शेख अजहर हा सिव्हिल इंजिनिअर झाला, सुरवातीच्या काळात थोडा पगार असला तरी भविष्यात चांगला पगार मिळेल या अपेक्षेने वडिलांनी त्याचे लग्नही करून दिले. मात्र, कोरोनाच्या संकटाने मिळालेला जॉबही गेला. त्यामुळे सगळी स्वप्न घेऊन पुन्हा त्याला आपल्या गावी (सोनगीर) परतावे लागले आहे. घरी बसून काय करणार म्हणून शेतात कामाला जात आहे. वडिलांनी शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा व त्यानंतर पाहिलेले स्वप्न पूर्ण न झाल्याची सल त्याच्या मनात आहे. 

हजार कमावणे हात दोनशेवर आले 
कोरोनाच्या संकटाने जॉब हिरावला गेला परिणामी मोठ्या शहरांमध्ये विविध कंपन्यांत काम करणारे शेकडो युवक आज गावाकडे परतले आहेत. गावी परतल्यानंतर सुरवातीला बरेच जण घरी बसून होते. पण, जवळ असलेले पैसेही संपले. शिवाय खरीप हंगामही सुरू झाला. त्यामुळे हे मुंबई, पुण्यातले इंजिनिअर्स, इतर खासगी कंपनीतले नोकरदार आज आपापल्या शेतात राबत आहेत, काहीजण इतरांच्या शेतात रोजंदारी करत आहेत. रोज हजार-दोन हजार रुपये कमावणारे काही हात आज दोनशे रुपयांसाठी शेतात दिवसभर राबत आहेत. त्यातल्या त्यात जमेची बाजू एवढीच की यातील बहुतांश हे शेतकऱ्यांचीच मुले असल्याने त्यांना शेतात काम करण्याची अनुभव आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे विविध कंपन्यांमध्ये कामासाठी गेलेले तालुक्‍यातील अनेकजण आपापल्या गावी परतले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule engineers work at farm