सुनेच्या मनोधैर्याची प्रशंसा... पीपीई कीट घालून दिला अग्निडाग !

निखील सुर्यवंशी
Tuesday, 28 July 2020

कोरोनाच्या धाकाने मृतदेह उचलण्यापासून अंत्यसंस्काराच्या विधीकडे पाठ फिरवीत असल्याचे प्रकारही समोर आले. अमरधाममध्ये अंतिम विधीस परिसरातील रहिवाशांनीही विरोध दर्शविल्या घटना घडल्या.

धुळे  : पीपीई कीट परिधान करत महापालिकेच्या सफाई कामगार महिलेने कोरोनाबाधित सासऱ्यांना मंगळवारी (ता. २८) साश्रू नयनांनी अग्निडाग दिला. या कोरोना योद्धा ठरलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या मनौधर्याची प्रशंसा होत असताना तिने कोरोना विषाणूला न घाबरता मनातून भिती घालविण्याचे व स्वकीयांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 

कोरोना‌ पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार पुढे येत नसल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. ते कोरोनाच्या धाकाने मृतदेह उचलण्यापासून अंत्यसंस्काराच्या विधीकडे पाठ फिरवीत असल्याचे प्रकारही समोर आले. अमरधाममध्ये अंतिम विधीस परिसरातील रहिवाशांनीही विरोध दर्शविल्या घटना घडल्या. या स्थितीत मृतदेहाची अवहेलना होऊ नये म्हणून महापालिकेचे पथक, विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते पुढे सरसावले. यात प्रवीण अग्रवाल यांच्यासह दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामागील आठ एकरचा निर्जन प्लॉट अंत्यविधीसाठी उपलब्ध करून दिला. 

असे असताना महापालिकेच्या मच्छीबाजार भागातील दवाखान्यात सफाई कामगार असलेल्या रोहिणी संदीप वाघुले यांच्या कोरोनाबाधित व महापालिकेचे निवृत्त कर्मचारी सासऱ्यांचे उपचारावेळी निधन झाले. या संकटकाळात मागचापुढचा विचार न करताना श्रीमती वाघुले यांनी पीपीई कीट परिधान केले आणि नियोजीत जागेत सासऱ्यांना अग्निडाग देत अंतिम विधी पार पाडला. यावेळी त्यांना परवानगी देणारे महापालिकेचे साहाय्यक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव व पथकाच्या सहकार्याबद्दल आभार मानत कुणाच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाली, त्यात संबंधिताचा मृत्यू झाला तर न डगमगता, भिती घालवून अंत्यसंस्कारासाठी पुढे यावे, असे आवाहन श्रीमती वाघुले यांनी केले. त्यावेळी त्यांना अश्रू अनावर होत होते. त्यांना उपस्थित पती संदीप वाघुले यांचे पाठबळ मिळाले. श्रीमती वाघुले यांच्या मनोधैर्याची उपस्थित सर्वांनी प्रशंसा केली. त्यांनी सासऱ्यांची अधिक सेवा केल्याने अग्निडागाची परवानगी मागितली होती. 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Fireflies from father-in-law wearing PPE insects