शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालासाठी मुहूर्त सापडला

जगन्नाथ पाटील
Saturday, 26 September 2020

पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १४ फेब्रुवारीला झाली. या परीक्षेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. एमपीएसपीसम ही परीक्षा घेतली जाते.

कापडणे (धुळे) : पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा १४ फेब्रुवारीला झाली. आता बरोबर सात महिन्यांनंतर म्हणजे आठव्या महिन्यात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल लावण्याचा मुहूर्त पुण्याच्या शासकीय परीक्षा परिषदेला सापडला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल घोषित होणार असल्याचे पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाने शिक्षक संघटनांना कळविले आहे. 
पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा १४ फेब्रुवारीला झाली. या परीक्षेस राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. लाखावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. एमपीएसपीसम ही परीक्षा घेतली जाते. ओएमआर अर्थात संगणकीय प्रणालीने उत्तरपत्रिका तपासल्या जातात. त्यास विशेष वेळ लागत नाही. तरीही निकालाचा मुहूर्त सापडलेला नाही, याचे जाणकारांमधून आश्चर्य व्यक्त होत होते. फेब्रुवारीत परीक्षा झाली. २२ मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. तो सव्वा महिन्याचा कालावधीही पुरेसा होता. त्यानंतर जूनपासूनच बरेचसे व्यवहार पूर्ववत झाले. दहावी व बारावीचे निकाल घोषित झाले. तरीही शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालाची वाच्यता अद्याप केलेली नव्हती. निकालाबाबतची दिरंगाई अक्षम्यच आहे. निकाल लावण्याचे विस्मरण झाले की काय, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला होता. या दिरंगाईबाबत शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. आता विद्यार्थी व पालकांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. 

‘सकाळ’मुळे प्रश्‍न सुटला 
२३ सप्टेंबरला ‘शिष्यवृत्ती परीक्षा निकालाला सापडेना मुहूर्त’ या आशयाची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली अन्‌ राज्यभरातील शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक संघटनांकडून शिक्षण विभागाला विचारणा सुरू झाली. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे तानाजी कांबळे यांनी पुणे शिक्षण आयुक्त कार्यालयाला थेट निवेदन पाठविले. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निकाल घोषित करण्याची माहिती देण्यात आली. सदरची बातमी पालकांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल केली होती. याची दखल घेत गुरुवारी (ता. २४) निकालाचा मुहूर्त घोषित करावा लागला.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule five and sevan standard shishyavrutti exam result sakal impact