esakal | शंभर दिवसांत घरकुलांची स्वप्नपूर्ती 
sakal

बोलून बातमी शोधा

gharkul yojana

राष्ट्रीय आवास दिनानिमित्त ठाकरे सरकारचे राज्यात शंभर दिवसांत आठ लाख घरकुले साकारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सुमारे चार हजार कोटींचा निधी खर्च होईल.

शंभर दिवसांत घरकुलांची स्वप्नपूर्ती 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : ठाकरे सरकारने शुक्रवार (ता. २०)पासून येत्या २२ फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच या शंभर दिवसांच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात पात्र लाभार्थ्यांच्या घरकुलांची स्वप्नपूर्ती व्हावी, म्हणून महाआवास अभियानाला सुरवात केली. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी चारनंतर व्हिडिओ कॉन्फरन्स घेत अधिकारी, कर्मचारी वर्गाला घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीतून पुण्यकर्म पदरात पाडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार जिल्ह्यातील यंत्रणेने पूर्वतयारीला सुरवात केली. 
राष्ट्रीय आवास दिनानिमित्त ठाकरे सरकारचे राज्यात शंभर दिवसांत आठ लाख घरकुले साकारण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी सुमारे चार हजार कोटींचा निधी खर्च होईल. या योजनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माहिती दिली. पात्र एका लाभार्थ्याला प्रतिघरकुल दीड लाख रुपये, तर डोंगराळ भागातील लाभार्थ्याला एक लाख ६० हजारांचे अनुदान मिळेल. एक घरकुल २६९ स्क्वेअरफुटांचे असेल. ते वाढीव हवे असल्यास लाभार्थ्याला बँकेतून ७० हजारांहून अधिक कर्ज देण्याची सोय आहे. शासकीय जागेवर अतिक्रमणही नियमानुकूल केले जाईल. 

विविध पुरस्कारांची संधी 
निर्धारित कालावधीत घरकुले साकारल्यास उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य, जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक शाखा, जलदपणे जागा देणाऱ्या ग्रामपंचायती आदी विविध स्वरूपाचे पुरस्कार प्रदान होतील. शंभर दिवसांत शंभर टक्के मंजुरी, शंभर टक्के पूर्तता, गुणात्मक काम, अशी सकारात्मक भूमिका यंत्रणेने ठेवावी, अशी अपेक्षा मंत्र्यांनी व्यक्त केली. या संदर्भात झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी संजय यादव, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बी. एम. मोहन, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोज दास आदी उपस्थित होते. 

जिल्ह्यातील सद्यःस्थिती 
श्री. मोहन यांनी सांगितले, की महाआवास अभियानाचा शुक्रवारी प्रारंभ झाला. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय उद्दिष्ट लवकरच प्राप्त होऊ शकेल. यात अपूर्ण, प्रलंबित घरकुलांची कामे पूर्ण करावीत, अशी सरकारला अपेक्षा आहे. जिल्ह्याला २०२०-२०२१ साठी १२ हजार ७७ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. रमाई आवास योजनेंतर्गत जानेवारीपासून जिल्ह्याला निधी मिळालेला नाही. महाआवास अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असेल. घरकुलाचा अनुदानित निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. अभियानांतर्गत प्रशिक्षण वर्ग लवकर पार पाडले जातील. श्री. दास म्हणाले, की बँक शाखा, विमा प्रतिनिधींचा लवकरच मेळावा घेतला जाईल. जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की सरकारचे हे मोठे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. ते प्रभावीपणे आणि लाभार्थ्यांना समाधान लाभेल, अशा स्वरूपात राबवावे. अडचणीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी सहकार्य करतील. शक्यतोवर गावनिहाय उद्दिष्ट देऊन अभियान वेळेत राबविता येऊ शकते. यंत्रणेने पूर्वतयारीला वेग द्यावा. 

संपादन ः राजेश सोनवणे