धुळे जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

जुलै ते डिसेंबरपर्यंत धुळे तालुक्यातील ७२, साक्री तालुक्यातील ४९, शिंदखेडा तालुक्यातील ६३ आणि शिरपूर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे.

सोनगीर (धुळे) : धुळे जिल्ह्यातील जुलै ते डिसेंबरदरम्यान मुदत संपणाऱ्या २२१ ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेचा अंतिम टप्पा सुरू करण्यास राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. प्रभाग रचना, आरक्षणास मान्यता देणे तसेच व्यापक प्रसिद्धी देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युवकांमध्ये निवडणुकीची उत्सुकता आहे. 
जुलै ते डिसेंबरपर्यंत धुळे तालुक्यातील ७२, साक्री तालुक्यातील ४९, शिंदखेडा तालुक्यातील ६३ आणि शिरपूर तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात येत आहे. त्यापैकी धुळे तालुक्यातील ४०, साक्री तालुक्यातील २२ व शिंदखेडा तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे. जिल्ह्यातील २२१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना, मतदारयादी व निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला होता.

अंतिम मान्यता बाकी
कोरोनामुळे १७ मार्चला ही प्रक्रिया थांबविण्यात आली. आता लॉकडाउन शिथिल झाल्याने पुन्हा त्याच स्थितीवरून पुढे कामकाजास प्रारंभ करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार मंगळवारी (ता. २७) प्रांताधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेले प्रस्ताव तपासून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभागरचना व आरक्षणास अंतिम मान्यता देऊन स्वाक्षरी करणे. तसेच २ नोव्हेंबरला मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेस व्यापक प्रसिद्धी देण्याचे आदेश आहेत. परिणामी, ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, गावोगावी युवकांमध्ये तयारी सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule gram panchayat election process start