निवडणुकीसाठी शिवसेनेने फुंकले रणशिंग 

एल. बी. चौधरी
Thursday, 17 December 2020

शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार असून, स्वतंत्र पॅनल देण्याचा प्रयत्न करेल,  काही प्रभागात तीन उमेदवारांचे गट किंवा पॅनल तयार करून, तर बहुतांश उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवतात. ग्रामपंचायत निवडणुकीपुरते पक्षभेद विसरले जातात.

सोनगीर (धुळे) : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेने रणशिंग फुंकले असून, कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे आवाहन केले आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षविरहित होत असल्याने शिवसेना सर्व जागांवर उमेदवार देणार असून, स्वतंत्र पॅनल देण्याचा प्रयत्न करेल, असे शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी यांनी सांगितले. 
येथे मंगळवारी (ता. १५) शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक शहरप्रमुख अर्जुन मराठे यांच्या हाॅटेलवर झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी अध्यक्षस्थानी होते. 
येथील ग्रामपंचायत निवडणूक ना पक्षपातळीवर होते ना पूर्ण १७ सदस्यांसाठी पॅनल तयार होते. काही प्रभागात तीन उमेदवारांचे गट किंवा पॅनल तयार करून, तर बहुतांश उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवतात. ग्रामपंचायत निवडणुकीपुरते पक्षभेद विसरले जातात. त्यामुळे शक्यतो बहुपक्षीय गटाचा सरपंच व उपसरपंच होतो. मावळत्या सरपंच योगिता महाजन काँग्रेस व उपसरपंच धनंजय कासार शिवसेनेचे होते. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी आहे. मात्र, एकमेकांच्या उमेदवारांना मदत करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. 

भगवा फडकलाच पाहिजे
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माळी यांनी निवडणुकीत शिवसेनेचे अधिकाधिक उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांनी कंबर कसून प्रत्येक मतदारापर्यंत पोचणे गरजेचे असून, त्यांना शिवसेनेचे कार्य पटवून देत त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढे व्हावे, अशा सूचना दिल्या. ग्रामपंचायतीवर भगवा फडकलाच पाहिजे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. अर्जुन मराठे, माजी उपसरपंच धनंजय कासार, कैलास वाणी, दिनेश देवरे, श्याम माळी, सुनील माळी, नंदू सैंदाणे, भूषण कासार व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule gram panchayat election shiv sena