ग्रा.पं.च्या निवडणुका होणार लक्षवेधी; इच्छुकांची परीक्षा, मोर्चाबांधणी सुरू ! 

जगन्नाथ पाटील
Saturday, 12 December 2020

जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. धुळे तालुक्यात ७२ वर ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात कापडणे व सोनगीर या १७ सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत.

कापडणे : धुळे जिल्ह्यासह राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे सूप वाजले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गुडघ्याला बाशिंग बसून असलेल्यांना स्फुरण चढले आहे. घोडा मैदान जवळ आले आहे. त्यांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या कापडणे व सोनगीर येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहे. पंधराव्या वित्त आयोगाचा कोटीवर मिळणाऱ्या निधीने इच्छुकांची संख्या मोठी वाढणार आहे. 

आवश्य वाचा- शेतकऱ्यांना वीज, पाणी मुबलक उपलब्ध होणार 

अकरा महिन्यानंतर प्रचाराचा धुराळा 
धुळे व नंदुरबार जिल्हांमध्ये जानेवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. तो निवडणूक कार्यक्रमही डिसेंबरमध्ये लागला होता. आता बरोबर एक वर्षांनी पुन्हा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. प्रचारात मोठी रंगत येणार आहे. सहा ते आठ महिन्यांपासून कामाला लागलेल्या इच्छुकांची परीक्षा आता महिन्यावर आली आहे. 

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी अन्‌... 
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत असतो. मोठ्या पंचायतींमध्ये वर्षभरासाठी जवळपास कोटीभर निधी मिळत आहे. त्यामुळे पंचायतीचे पदाधिकारी होण्याचे अर्थपूर्ण स्वप्न साऱ्यांनाच पडू लागले आहे. 

आवर्जून वाचा- श्‍वानासाठी ‘त्या’ने पत्करला गुन्हेगारीचा मार्ग 

 

कापडणे, सोनगीरमध्ये शेकड्यावर इच्छुक 
जिल्ह्यात २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. धुळे तालुक्यात ७२ वर ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात कापडणे व सोनगीर या १७ सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. येथील निवडणुकींमध्ये शांततायुक्त मोठी चुरस असते. येथील इच्छुकांची संख्या शंभरापेक्षा अधिक आहे. पॅनल प्रमुखांना त्यांची मनधरणी करण्यासाठी नाकीनऊ येणार आहे. ते कशी समजूत घालतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष राहणार आहे. 
दरम्यान, इच्छुक आणि त्यांचे समर्थकांची धावपळ सुरू झाली आहे. त्यांच्या रणनीतीवर विरोधकांसह ग्रामस्थांचे लक्ष राहणार आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Gram Panchayat elections looming, the aspirants started forming a fron