भूजलपातळी वाढीत शिंदखेडा तालुक्याची सरशी! 

भूजलपातळी वाढीत शिंदखेडा तालुक्याची सरशी! 


चिमठाणेः अनियमित पर्जन्यमानामुळे अवर्षणग्रस्त, कायम दुष्काळी अशी शिंदखेडा तालुक्याची ओळख पुसण्यासाठी माजी पर्यटनमंत्री तथा आमदार जयकुमार रावल सरसावले. त्यांनी जलयुक्त शिवार अभियान आणि स्वविकसित बुराई पॅटर्नचा संगम साधत तालुक्याचा जलस्तर वाढविण्याचा प्रयत्न केला. तो वरुणराजाच्या कृपेने सफल झाला आणि आमदार रावल यांच्या प्रयत्नांचे चीज झाले. 
 

दोन वर्षांपासून घडविल्या जात असलेल्या जलक्रांतीमुळे यंदा जिल्ह्यात सर्वांत जास्त शिंदखेडा तालुक्याची २.५९ मीटरने भूजल पातळी वाढली आहे. त्यामुळे राज्याच्या दुष्काळी तालुक्याच्या यादीतून शिंदखेडा तालुक्याचे नाव कमी होणार आहे. मंत्रिपदाच्या माध्यमातून आमदार रावल यांनी साधलेली ही कामगिरी तालुक्याच्या विकासाची नांदी आहे. जलक्रांतीमुळे पिण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटला आहे. 

बुराई पॅटर्न उदयास 
तालुका अवर्षणग्रस्त असल्याने अपेक्षित पावसाची नोंद होत नाही. मात्र, दोन वर्षांपासून चांगले पर्जन्यमान होत आहे. तालुक्यातून तापी, बुराई, पांझरा, अमरावती, सूर या प्रमुख नद्या वाहतात. तालुका दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न दाखवून अनेक विधानसभा निवडणुका लढविल्या गेल्या. मात्र, दुष्काळाचा कलंक पुसला जात नव्हता. अशात आमदार रावल यांना भाजपच्या सत्ताकाळात कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. त्यांनी या संधीचे सोने केले. यात बुराई बारमाही करण्याचा संकल्प सोडला. 

आवश्य वाचा- जळगाव मनपा स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजप सदस्यांमध्ये रस्सीखेच 


७५० हेक्टरवर सिंचन 
या पार्श्वभूमीवर आमदार रावल यांनी दुसाणे (ता. शिंदखेडा) ते वरसूस (ता. शिंदखेडा) या ५४ किलोमीटर क्षेत्रात एप्रिलच्या रणरणत्या उन्हात पाच दिवस पायी प्रवास करत बुराई बारमाही पॅटर्न निर्माण केला. बुराई नदीचा माथा ते पायथा, या नदीला मिळणाऱ्या उपनद्या, अशा क्षेत्रात एकूण ३४ साठवण बंधारे शंभर दिवसांत बांधले. त्यातून सरासरी ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनखाली येत आहे. वरुणराजाच्या कृपेने यंदा बंधाऱ्यात अपेक्षित साठा झाला आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे. कूपनलिका, विहिरींची पातळी वाढल्याने हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com