esakal | कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटत नाही तोपर्यंत निरनिराळ्या नियमांचे पालन करणे, खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.
sakal

बोलून बातमी शोधा

कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको !

कमी रुग्णसंख्येत धुळे जिल्हा प्रथम..कोरोनावर राजकारण नको !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : राज्यात सर्वांत कमी कोरोनाबाधित रुग्णसंख्या असलेला धुळे पहिला जिल्हा ठरला आहे. त्यासाठी जिल्हावासीयांसह जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या सीईओ वान्मती सी., महापालिका आयुक्त अजीज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित आणि आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले पाहिजे, असे सांगत कोरोनाच्या संसर्गाची साखळी तुटत नाही तोपर्यंत निरनिराळ्या नियमांचे पालन करणे, खबरदारी बाळगणे आवश्यक असल्याची जाणीव पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी करून दिली.

हेही वाचा: खून केला अन्‌ फोनवरून बेशुद्ध पडल्‍याचे कळविले

महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि कामगार दिनानिमित्त मंत्री सत्तार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १) सकाळी आठला जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन झाले. पोलिस दलाच्या तुकडीने मानवंदना दिली. महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे आदी उपस्थित होते.

आरोग्य सेवेचे बळकटीकरण

मंत्री सत्तार म्हणाले, की जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात येत आहे. त्याचे श्रेय महसूल, पोलिस आणि आरोग्य यंत्रणेला जाते. त्यांनी योग्य प्रमाणात समन्वय ठेवल्याने स्थितीत सुधारणा होत आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन केले तर स्थितीत अधिक सुधारणा होईल. आगामी काळात जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याचा प्रयत्न होईल. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या लसीकरणाची जबाबदारी व्यक्तिगत घेत आहे. नागरिकांनी आतापर्यंत शासन, प्रशासनाला सहकार्य केले आहे. यात मास्कचा सतत वापर, शारीरिक अंतर राखणे, गर्दी टाळणे, वेळोवेळी साबणाने हात धुणे, सॅनिटाइझ करणे आणि लॉकडाउनचे पालन करून कोरोना संसर्ग टाळावा, असे आवाहन आहे.

हेही वाचा: ऑक्सिजनअभावी दोघांचा मृत्यू; पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

आधुनिक रुग्णवाहिका देणार

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर लवकरच कष्टकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य वितरित होईल. प्राथमिक आरोग्य केंद्रे सुसज्ज केले जातील. चौदाव्या वित्त आयोगातील काही निधी शिल्लक आहे. त्यातून या प्रत्येक केंद्राला अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली जाईल. तसा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला सादर झाला आहे. नंतर ऑक्सिजनयुक्त खाटांची सोय करण्याचा प्रयत्न राहील. धुळे शहरासाठी आयुक्तांनी अकराशे रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध केले. त्यांचे कौतुक असून, इंजेक्शन गरजूंना दिले जावे. कोरोनाचा संसर्ग आणि उपचारासंदर्भात कुठलेही राजकारण होऊ नये, असे पालकमंत्री सत्तार म्हणाले. जगदीश देवपूरकर, सय्यद वाहिद अली यांनी सूत्रसंचालन केले.

ऑक्सिजन प्रकल्पांची निर्मिती

सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनची नितांत आवश्यकता आहे. तसेच आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ते लक्षात घेता जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई भासू नये म्हणून लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांटची निर्मिती होणार असल्याचे पालकमंत्री सत्तार यांनी सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image