esakal | चैत्र नवरात्रीत कुलदेवतांची मंदिरे पडली ओस; सर्वच कुलदेवतांचे यात्रोत्सव रद्द

बोलून बातमी शोधा

null

चैत्र नवरात्रीत कुलदेवतांची मंदिरे पडली ओस; सर्वच कुलदेवतांचे यात्रोत्सव रद्द

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झाला. खानदेशासह राज्यातील सर्वच कुलदेवतांचा यात्रोत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो. ही सर्व मंदिरे लॉकडाउनच्या कडक निर्बंधांमुळे बंद झाली आहेत. मंगळवारी (ता. १३) चैत्र नवरात्रीच्या पहिल्या माळेला केवळ पुजाऱ्यांनीच विधिवत पूजाविधी करून नवरात्र ज्योत लावली. भाविकांना प्रवेश नसल्याने व विविध व्यावसायिकांची दुकानेही बंद असल्याने सारा परिसरच ओस पडला आहे.

जिल्ह्यातील कुलदेवतांची मंदिरे

जिल्ह्यात एकविरामाता (धुळे), धनदाईमाता (म्हसदी), पेडकाईमाता (सावळदे), जोगाईमाता (कापडणे), धनाई-पुनाईमाता (निजामपूरजवळ), बिजासनीमाता (शिरपूर ते सेंधवादरम्यान), जोगेश्वरीमाता (जोगशेलू), योगेश्वरीमाता, संतोषीमाता (धुळे), पाच पावलीमाता (कापडणे), भवानीमाता (कुसुंबा), आशापुरीमाता (पाटण), अन्नपूर्णामाता (कापडणे), भटाईमाता (भदाणे), म्हाळसामाता (अर्थे), इंदाशीमाता (कुंडाणे), सतीमाता (बोरीस) आदी कुलदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिरांवर वर्षभर भाविकांची रीघ असते.

कोरोनाच्या प्रादुर्भामूळे व्यावसायिक अडचणीत

चैत्र नवरात्रीत भाविकांची मोठी वर्दळ वाढते. भाविक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि लॉकडाउनची बंधने असल्याने मंदिरे बंद आहेत. सर्वच विश्वस्त संस्था नियमांचे बंधन पाळत आहेत. दरम्यान, नवरात्रीमध्ये देवधर्म, पूजाविधी, विविध मंदिरांमध्ये होणारे धार्मिक महोत्सव आदींमुळे भाविकांची वर्दळ वाढती असते. मात्र, वर्षभरापासून धार्मिक पर्यटनास पूर्णतः बंदी आहे. मंदिरे उघडण्यास परवानगी नसल्याने व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.

मराठी वर्षाची नावीन्यता

आजपासून मराठी नववर्ष सुरू झाले. मराठी वर्षाची नावीन्यता पारंपरिक पद्धतीने पुढीलप्रमाणे सांगितली जाते. चैत्र नेसतो सतरा साड्या, वैशाख ओढतो वऱ्हाडाच्या गाड्या, ज्येष्ठ बसतो पेरित शेती, आषाढ धरतो वरती छत्री, श्रावण लोळे गवतावरती, भाद्रपद गातो गणेश महती, आश्विन कापतो आडवे भात, कार्तिक बसतो दिवाळी खात, मार्गशीर्ष घालतो शेकोटीत लाकडे, पौषाच्या अंगात उबदार कपडे, माघ करतो झाडी गोळा, फाल्गुन फिरतो जत्रा सोळा.