धुळ्यात वीस लाखांचा गुटखा साठा जप्त !

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 16 May 2020

मुद्देमाल पंधरा ते सोळा लाखांवर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मालाची मोजणी करणे आवश्‍यक असून, ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

धुळे : शहरातील साक्री रोड परिसरातील कुमारनगरमध्ये एका व्यापाऱ्याच्या दुकानालगत खोलीत गुटखा, तंबाखू, पानमसाल्याचा मोठा साठा आढळला, पंधरा ते वीस लाखांचा माल असल्याचा प्राथमिक अंदाज असून, दुपारी दोनला छापा टाकल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कारवाईचे काम सुरू होते. 

शहरासह जिल्ह्यात लॉकडाउनसह मनाई आदेश जिल्हाभरात लागू केले आहेत. दुपारनंतर अत्यावश्‍यक सेवेत असलेली किराणा मालाची विक्रीही बंद केली आहे. बंदनंतरही दुपारनंतंर पानमसाल्यासह राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना मिळाली. अधीक्षक पंडित यांच्यासह शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, "एलसीबी'चे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पोलिस पथकाने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास कुमारनगरमध्ये छापा टाकला. तेथील व्यापारी बाबूशेठ आसिजा याचा बंगला आहे, त्यालगत किराणा दुकान असून, तेथील एका खोलीत प्रतिबंधित मालाचा साठा आढळला. त्यात विदेशी सिगारेट, विडीसह सुगंधी गुटखा, पानमसाला आदींचा मोठा साठा होता. अवैधरीत्या साठा केल्याचे प्राथमिक तपासात आढळल्यानंतर पोलिसांनी तो ताब्यात घेतला. मिनीट्रकसह लहान मोठी सहा ते सात वाहने भरून माल शहर पोलिस ठाण्यात आणला. दुपारी दोनला सुरू झालेली कारवाई रात्री दहानंतरही सुरूच होती. सर्व मुद्देमाल पंधरा ते सोळा लाखांवर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मालाची मोजणी करणे आवश्‍यक असून, ती पूर्ण झाल्यानंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

नेमका पुरवठा कुणाकडून? 
गेल्या काही दिवसांत शहरासह परिसरात गुटखा पान मसाला आदींवर अवैधरीत्या विक्री सुरू असल्याचे दिसून आले आहे. तशी कारवाईही स्थानिक पोलिसांनी केली. या मालाचा पुरवठा नेमका कुणाकडून होतो, याबाबत अद्याप ठोस माहिती नाही; परंतु या कारवाईनंतर शहरातील काही मोठे व्यापारी अवैधरीत्या या पद्धतीने मालाचा साठा करून तो लहान विक्रेत्यांना पुरवठा करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस तपासात या बाबींचा लवकरच उलगडा होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Gutka stocks worth 20 lakh seized

Tags
टॉपिकस
Topic Tags: