पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ७०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंती मंदिराची झाली दुरावस्था 

पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे ७०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंती मंदिराची झाली दुरावस्था 

कापडणे : मेथी (ता. धुळे) येथील सुमारे ७०० वर्षांपूर्वीच्या पुरातन हेमाडपंती मंदिरांची दुरवस्था झाली आहे. मंदिरांची पुरातत्त्व विभागाने देखभाल करणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा मंदिरांची पाहणी झाली, पण देखभाल दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. मंदिरांची दुरुस्ती झाल्यास पर्यटक मेथीकडे वळतील. 

भवानीमातेचे पुरातन मंदिर 
मेथी सुमारे सहा हजार लोकवस्तीचे गाव. गाव दरवाजाजवळ उजव्या बाजूला सातशे वर्षांपूर्वीचे भवानीमातेचे हेमाडपंती पुरातन मंदिर आहे. संपूर्ण दगडात मंदिर उभे राहिले आहे. दगडात कोरीव नक्षीकाम केले आहे. मंदिरावरील घुमटावरही आकर्षक कोरीव कलाकुसर लक्ष वेधून घेते. 

गरुडाची समाधी 
भवानीमातेच्या मंदिरासमोर गरुडाची समाधी आहे. तेथे गरुडाचे सिंहासनही आहे. सिंहासनाची रचना तीन आकर्षक दगड एकमेकांवर ठेवून केली आहे. सिंहासनावर दगडी छत्री, तसेच गरुडाची संगमरवरी प्रतिकृती आहे. सिंहासनावर वेगवेगळ्या तीन भागांवर आघात केल्यास वेगवेगळे ध्वनी ऐकू येतात. वरच्या भागात ठणठण आवाज येतो. मधल्या भागात मंजूळ ध्वनी, तर खालच्या भागात दगड मारल्यानंतर दोनदा ध्वनी ऐकू येतो. 

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 
भवानीमातेच्या मंदिराच्या बाजूलाच विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर आहे. पूर्ण दगडात कोरीव काम असलेल्या मंदिराचा सभामंडप हेमाडपंती वास्तुशिल्पाचा आदर्श नमुना आहे. मंदिर खालच्या भागात असूनही पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने केला आहे. 

पाय विहीर 
गावाच्या मागच्या बाजूला अहिल्याबाई होळकरांच्या काळातील पाय विहीर आहे. विहिरीचे बांधकाम पूर्ण दगडांनी केले आहे. तीन बाजूंनी विहिरीच्या तळापर्यंत पा‍यऱ्या आहेत. ही विहीर शक्यतो कोरडी होत नाही. मात्र, २००० मध्ये कोरडी झाली होती. विहिरीजवळ भगवान विष्णूची तीनमुखी मूर्ती आहे. अशी मूर्ती कोठेही आढळत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. 

महादेव मंदिर 
अहिल्याबाई होळकर विहिरीपासून शंभर मीटरवर महादेव मंदिर आहे. दगडी कोरीव काम असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्यात दोन तळघरे असल्याचे सांगितले जाते. तळघरांची लोखंडी द्वारे होती. ती बंदिस्त झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मंदिराची मोठी पडझड झाली आहे. 

विष्णूदेवाच्या मंदिराजवळ पणत्या ठेवण्यासाठी आकर्षक लोखंडी जाळी आहे. चारही बाजूंनी दगडीकाम असलेली लहान लहान सात मंदिरे आहेत. सातपैकी काही मंदिरांची पडझड झाली आहे. ग्रामस्थांनी महाविष्णू मंदिर पूर्ण ढासळल्याने २००० पूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरातील भिंतीवर कोरलेल्या यादवकालीन मूर्तीही दिसतात. भिंतीवर मोडी भाषेत काही ओळी कोरलेल्या दिसतात. ही भाषा वाचता येत नसल्याने जाणकारांचा हिरमोड होतो. दरम्यान, प्रागैतिहासिक गावातील मंदिरांची दुरुस्ती व्हावी, पुरातत्त्व विभागाने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. 

माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी मंदिर दुरुस्ती व सुशोभीकरणासाठी एक कोटी वीस लाख मंजूर केले होते. काहीअंशी निधी मिळाला. कुंपणाचे काम झाले. त्यानंतर सरकार बदलल्याने निधी गोठविला गेला. तो मिळणे आवश्यक आहे. मंदिराची मोठी पडझड सुरू आहे. 
-रमाकांत बागले, सरपंच, मेथी.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com