गंभीर रुग्ण सांभाळायचे, की तक्रारी सोडवायच्या..?

निखिल सूर्यवंशी
Wednesday, 3 June 2020

हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्याचा सपाटाच तालुक्‍यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेने लावला.

धुळे : एरवीप्रमाणे "कोरोना'च्या संकटकाळातही धुळे जिल्हाच काय तर नंदुरबार, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव, सटाणा आणि अपघातामुळे राज्यातील ठिकठिकाणच्या रुग्ण, नातेवाइकांचा भार सर्वाधिक भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर येऊन पडला. त्यामुळे या महाविद्यालयास चांगले कामकाज करूनही टीकेला सामोरे जावे लागले. हाच भार चारही तालुक्‍यातील पालिकांचे दवाखाने, आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी निरनिराळ्या पद्धतीने विभागून घेतला असता, शिरपूर पालिकेप्रमाणे आरोग्य व्यवस्थेचे सक्षमीकरण केले असते, तर संकटकाळात जिल्ह्यात वेगळे चित्र दिसले असते. त्याचाच मागोवा घेणारी आणि आरोग्य व्यवस्थेला दिशा देणारी मालिका आजपासून... 

केवळ "कोविड 19' नव्हे, तर "नॉन कोविड' अशा "क्रिटिकल' रुग्णांना पाहायचे, त्यांना सेवा पुरवायची, की त्यांच्या नातेवाइकांच्या तक्रारीच सोडवत बसायच्या, अशा कात्रीत येथील चक्करबर्डीतील हिरे मेडिकलचे कार्यक्षम, तज्ज्ञ डॉक्‍टर, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग सापडला आहे. त्यात महापालिका हद्दीसह चारही तालुक्‍यांचा भार या महाविद्यालय आणि संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाला सोसावा लागला. यामुळे जिल्ह्यातील इतर सरकारी आरोग्य व्यवस्था "व्हेंटिलेटर'वर असल्याचे चित्र प्रकर्षाने समोर आले आणि ही स्थिती सुधारण्याबाबत "कोरोना'ने प्रशासन, राजकीय पुढाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनही घातले आहे. 

संसर्गजन्य "कोरोना'चा मार्चपासून प्रार्दुभाव वाढू लागला. त्यामुळे येथील हिरे मेडिकल कॉलेज कोविड केअर सेंटर घोषित झाले. यात हिरे महाविद्यालय केवळ कोरोनाग्रस्तांसाठी ठेवावे आणि इतर रुग्णांसाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या खासगी रुग्णालयात व्यवस्था केली जावी, असा प्रस्ताव पुढे आला. तो अद्याप अमलात आला नाही. "नॉन कोविड' म्हणजे प्रसूती, अपघातासह विविध प्रकारचे रुग्ण हिरे महाविद्यालयाच्या आणि जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या दुसऱ्या इमारतीत उपचार घेत आहेत. त्यामुळे "कोरोना'चे रुग्ण, संशयित आणि ते वगळता इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचा भार संकटकाळातही हिरे वैद्यकीय महाविद्यालयाला सोसावा लागत आहे. 

भार वाढला, पण... 
"कोरोना'ने जिल्ह्यात पाय पसरल्यानंतर महापालिका, इतर पालिकांच्या हद्दीसह धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्‍यात लक्षणे असलेले किंवा संशयित व्यक्तींना सरळ हिरे वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्याचा सपाटाच तालुक्‍यातील स्थानिक आरोग्य व्यवस्थेने लावला. असे असताना महाविद्यालयासह जिल्हा रुग्णालयात मार्चपासून अहोरात्र, अथक रुग्णसेवा देणारे तज्ज्ञ डॉक्‍टर, कर्मचारी नाक न मुरडता कार्यरत राहिले. पण जसजसा भार वाढत गेला, तसे त्यांना गंभीर रुग्ण सांभाळायचे, त्यांना सेवा पुरवायची, की वाढते रुग्ण, नातेवाइकांच्या तक्रारीच सोडवत बसायच्या, असा प्रश्‍न आजही सतावतो आहे. तज्ज्ञ डॉक्‍टर, प्राध्यापकांची कार्यक्षमता ही रुग्णसेवेऐवजी तक्रारी सोडविण्यातच गुंतून राहिली तर चांगली सेवा मिळणार कशी, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. याबाबत सर्वच तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी व आरोग्य यंत्रणेने विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule hire Government Medical College Health problem