धुळे‘सिव्हिल’मध्ये दीडशे खाटांची व्यवस्था व्हावी 

निखिल सूर्यवंशी
Sunday, 23 August 2020

कोविडच्या संकटकाळात लोकप्रतिनिधी आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने निधी आणि अपेक्षित सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडूनही कोविडप्रश्‍नी निधी दिला जात आहे.

धुळे : हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा सर्वोपचार रुग्णालय चक्करबर्डीत स्थलांतर झाल्यावर शहरातील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयाची (सिव्हिल) जागा कोविडच्या रुग्णांसाठी उपयोगात आणली जावी, अशी मागणी आहे. या रुग्णालयात शंभर खाटांचे सर्वसाधारण, तर शंभर खाटांचे नवजात शिशू, स्त्री रुग्णालय मंजूर आहे. पैकी सध्या ६० खाटांची व्यवस्था आहे. पहिल्या टप्प्यात उर्वरित १४० खाटा, काही इमारतींच्या देखभाल दुरुस्तीसाठी तत्काळ अपेक्षित निधी मिळविण्याची गरज आहे. 
कोविडच्या संकटकाळात लोकप्रतिनिधी आणि जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने निधी आणि अपेक्षित सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्हा नियोजन मंडळाकडूनही कोविडप्रश्‍नी निधी दिला जात आहे. या कालावधीत निधी मिळविला, खाटा उपलब्धतेसाठी जोर लावला तर सिव्हिलमध्ये कायमस्वरूपी विविध सोयीसुविधांची उपलब्धता होईल. त्यामुळे गरीब, गरजूंना दिलासा मिळेल. कोविडप्रश्‍नी शासकीय निधीतून इतर महाविद्यालये, रुग्णालये ऑक्सिजनयुक्त बेडच्या सुविधेने सुसज्ज केली जात आहेत. त्याप्रमाणे सिव्हिलची क्षमता वाढीसाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. 

वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा 
सिव्हिलचे लोकार्पण झाले आहे. या रुग्णालयात प्रसूती, भूलतज्ज्ञ, मेडिसीन, आर्थोपीडिक, फिजिशियन तसेच नर्सिंगची पदे भरलेली आहेत. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर ओपीडी सुरू झाली. त्या कालावधीत किती रुग्ण आले, किती ऑपरेशन झालेत, या रुग्णालयाचे वार्षिक अंदाजपत्रक किती होते, किती निधी खर्च झाला, भरलेल्या पदांवरील डॉक्टर, इतर कर्मचारी क्षमतेने काम करत होते किंवा कसे, कोविडच्या संकटकाळात सिव्हिलमधील किती कर्मचारी क्षमतेने काम करत आहेत, पूर्वीच्या काळातील कामकाज आणि सध्याच्या स्थितीतील कामकाजाची तुलनात्मक स्थिती कशी, कोविडच्या काळात सिव्हिलला किती निधी मिळाला आदी बाबींचा राज्य शासनासह जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आढावा घेण्याची गरज वैद्यकीय पातळीवरून व्यक्त होते. त्यामुळे सिव्हिल क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी दिशा मिळू शकेल, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले. 

क्षमतावाढीला वाव 
सिव्हिलच्या जागेत जिल्हा सर्वोपचार रुग्णालय असताना सरासरी तीनशे खाटांची सुविधा होती. त्यासह आणखी शंभर खाटांची व्यवस्था होऊ शकेल, अशी जागा सिव्हिलमध्ये उपलब्ध आहे. प्रसंगी त्यासाठी निधीची मागणी शासनाकडे होऊ शकते. त्यातून आवश्‍यक बांधकामे, खाटांची खरेदी करता येऊ शकते. कोविडमुळे शासनाने आरोग्य सुविधा बळकटीकरणावर भर दिला आहे. त्यात सिव्हिलच्या बळकटीकरणासाठी लोकप्रतिनिधी आणि सिव्हिलने समन्वयातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस 
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांनी कोविडच्या संकटकाळात कामकाजात नि‍ष्काळजीपणा केला. बरेच दिवस ते न सांगता रुग्णालयाबाहेर राहायचे. त्यांच्याविषयी बऱ्याच तक्रारी झाल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी यादव यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule hire medical collage patients cots avalable