esakal | जळगावच्या बाथरूममधील मृत्यूची पुनरावृत्ती धुळ्यातही...
sakal

बोलून बातमी शोधा

hire medical collage

रेलन यांनी शनिवारी दुपारी चारपर्यंत बोर्नव्हिटा किंवा लिंबू-पाणी आणावे, असे मुलगा रिंकू यांना सांगितले. ते मेडिकल व्यावसायिक आहेत. वडिलांच्या सूचनेप्रमाणे ते दुपारी साडेचारपर्यंत जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पोचले. नॉनकोविड कक्षात जाण्याची नातेवाईक किंवा त्रयस्थांना परवानगी नाही.

जळगावच्या बाथरूममधील मृत्यूची पुनरावृत्ती धुळ्यातही...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : बाथरूममध्ये आठवडाभर कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह पडून असल्याची जळगाव जिल्हा सरकारी रुग्णालयातील घटना ताजी असताना तशीच गंभीर घटना येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात शनिवारी (ता. 11) घडली. शहरातील प्रख्यात कापड दुकानामधील मुनीमजी ओमप्रकाश रेलन यांचा सायंकाळनंतर रुग्णालयाच्या बाथरूममध्ये मृत्यू झाला. गंभीर बाब म्हणजे, अर्धा- एक तासाने ही घटना त्यांचाच मुलगा रिंकू यांनी शोधाशोध केल्यानंतर उजेडात आली. त्यामुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त झाला. 
तीन दिवसांपूर्वी ओमप्रकाश रेलन (वय 70) यांचे पोट दुखत होते. त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नेण्याचे कुटुंबीयांचे नियोजन होते. मात्र, तेथे कॉट उपलब्ध नसल्याने, तसेच धुळे शहरात काही रुग्णालयांनी प्रथम "कोविड'संदर्भात तपासणी अहवालाची मागणी केल्याने कुटुंबीयांनी ओमप्रकाश रेलन यांना हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. त्यांचे तपासणीसाठी "स्वॅब' घेण्यात आले आणि तोपर्यंत रुग्णालयात उपचार सुरू झाले. रेलन यांना ऑक्‍सिजनची गरज होती. त्यामुळे कोविड तपासणी अहवाल येण्यापूर्वी त्यांना नॉनकोविड कक्षातील ऑक्‍सिजनची सुविधा पुरविण्यास सुरवात झाली. 

मुलाकडून शोधाशोध 
रेलन यांनी शनिवारी दुपारी चारपर्यंत बोर्नव्हिटा किंवा लिंबू-पाणी आणावे, असे मुलगा रिंकू यांना सांगितले. ते मेडिकल व्यावसायिक आहेत. वडिलांच्या सूचनेप्रमाणे ते दुपारी साडेचारपर्यंत जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पोचले. नॉनकोविड कक्षात जाण्याची नातेवाईक किंवा त्रयस्थांना परवानगी नाही. त्यामुळे वडील काय करत आहेत, याची माहिती प्रथम रिंकू रेलन यांनी घेतली. तेव्हा त्यांना वडील बाथरूमला गेल्याची माहिती मिळाली. पंधरा मिनिटे होऊनही वडिलांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रिंकू नॉनकोविड कक्षात गेले. इतर रुग्णांनी वडील बाथरूमला गेल्याची माहिती दिल्यावर रिंकू यांनी शोधाशोध सुरू केली. तपासणीनंतर एका बाथरूमचा दरवाजा उघडत नव्हता व प्रतिसादही मिळत नव्हता. पुन्हा पंधरा मिनिटे, अर्धा तासाने शोधाशोध केल्यावर प्रतिसाद मिळत नसलेला दरवाजा रिंकू यांनी ताकदीने उघडला. तेव्हा वडील ओमप्रकाश रेलन निपचीत पडलेले दिसले. रिंकू यांनी वडिलांना उचलत आयसीयू कक्षाकडे नेले. तेथे व्हेंटिलेटरच्या सहाय्याने उपचार झाले. मात्र, प्रतिसादाअभावी ओमप्रकाश रेलन यांचा मृत्यू झाल्याचे सायंकाळनंतर स्पष्ट झाले. त्यांचा कोविड अहवालही निगेटिव्ह आला आहे. रिंकू यांनी शोधाशोध केल्याने त्यांना वडिलांचा मृतदेह आढळला. 

सखोल चौकशीची गरज 
नॉनकोविड कक्षातील नियुक्त कर्मचारी, डॉक्‍टर नेमके कुठे होते? ओमप्रकाश रेलन यांना ऑक्‍सिजनची गरज असल्याचे माहीत असूनही त्यांना संबंधित कर्मचारी, डॉक्‍टरांनी बाथरूमला एकटे कसे जाऊ दिले? ऑक्‍सिजन कमी असलेल्या रुग्णाचा बाथरूममध्ये जोर लागला तर त्याचा मृत्यू ओढावू शकतो, हे शास्त्र माहीत असूनही संबंधित कर्मचारी, डॉक्‍टरांचा निष्काळजीपणा म्हणू नये तर काय? यांसह सर्व घटनेची चौकशी महाविद्यालय व्यवस्थापनाला करावी लागणार आहे.