esakal | ते आरोग्य उपकेंद्र चकाचक; तरीही आरोग्य विभागाचे ग्रामपंचायतीकडे बोट 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

तालुका आरोग्याधिकारी डॉ. आशुतोष साळुंखे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्यासह विस्ताराधिकारी एस. आर. बागले, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड यांनी आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन स्थितीची पाहणी केली.

ते आरोग्य उपकेंद्र चकाचक; तरीही आरोग्य विभागाचे ग्रामपंचायतीकडे बोट 

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : ‘जैताणे आरोग्य उपकेंद्र कोरोनातही बंद; राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव’ या मथळ्याखाली बुधवारी (ता. १८) ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य यंत्रणेसह स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले. रुग्णालय प्रशासनाने तत्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन इमारतीसह अंतर्गत परिसर स्वच्छ केला व गुरुवार (ता. १९)पासूनच आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित केले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील भदाणे यांच्या देखरेखीखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. 

टीएचओ व बीडीओंच्या भेटी 
संबंधित वृत्त समजताच तालुका आरोग्याधिकारी डॉ. आशुतोष साळुंखे व गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी यांच्यासह विस्ताराधिकारी एस. आर. बागले, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड यांनी आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन स्थितीची पाहणी केली. डॉ. साळुंखे यांनी रुग्णालय प्रशासनास त्वरित स्वच्छतेसह उपकेंद्र कार्यान्वित करण्याचेही आदेश दिले, तर गटविकास अधिकारी सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत प्रशासक जे. पी. खाडे व ग्रामविकास अधिकारी राठोड यांना उपकेंद्राच्या प्रवेशद्वारापासून ५० मीटर रस्त्याचे अंदाजपत्रक त्वरित मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनीही दूरध्वनीवरून उपकेंद्राची स्थिती जाणून घेतल्याचे डॉ. भदाणे यांनी सांगितले. 

आरोग्य विभागाचे ग्रामपंचायत प्रशासनाकडे बोट 
जानेवारीत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना महाले यांनी, तर बुधवारी पुन्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील भदाणे यांनी आरोग्य उपकेंद्रासमोरील रस्ता व गटारीच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. आरोग्य उपकेंद्राला लागूनच महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा व लोकवस्ती आहे. वास्तविक उपकेंद्रापासून थेट ग्रामदैवत भवानीमाता मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे. त्याबाबत स्थानिक प्रशासन मात्र अत्यंत ढिम्म आहे. गरोदरमाता व अत्यवस्थ रुग्ण असल्यास थेट उपकेंद्राच्या इमारतीपर्यंत रुग्णवाहिका जाणे अशक्य आहे. बुधवारी प्रवेशद्वारासमोरील गटार ओलांडताना उपकेंद्रातील परिचारिका गटारीत पडल्या होत्या. त्यामुळे गरोदरमाता व अन्य रुग्णांची कल्पनाच न केलेली बरी. स्थानिक लोकप्रतिनिधींनी जनतेच्या जिव्हाळ्याच्या आरोग्याच्या प्रश्नावर केवळ गटातटाचे व जातीपातीचे संकुचित राजकारण करू नये, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

संपादन ः राजेश सोनवणे