कोरड्या कूपनलिका फुल! 

खेमचंद पाकळे
Sunday, 18 October 2020

गावाने दोन वर्षापूर्वी (२०१८) जलसंवर्धनतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला.

लामकानी (धुळे) : ग्रामस्थांनी लोकवर्गणी, श्रमदान व यंत्राच्या साहाय्याने केलेल्या जलसंवर्धनाच्या उपाययोजनांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला असून त्याचा मोठा फायदा शेतशिवारातील विहीरी व कुपनलिकांना झाला आहे. शेतशिवारातील हजार फूट कोरड्या कुपनलिका यंदा तुडूंब झाल्याने शेतकऱ्यांना नगदी पिके घेण्यास मदत होत आहे. ग्रामस्थांनी एक दिलाने केलेल्या कार्याचे हे चीज आहे. 
लामकानीने (ता. धुळे) गेल्या वीस वर्षांपासून जलसंधारणावर भर दिला आहे. कुरण विकास आणि नवीन जैवविविधता निर्माण करण्याचे आदर्शवत पर्यावरणीय काम केले आहे. परंतु, गावाने दोन वर्षापूर्वी (२०१८) जलसंवर्धनतज्ज्ञ डॉ. धनंजय नेवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. दुष्काळ निवारण आणि शेतशिवार फुलवण्यासाठी लोकवर्गणी व श्रमदानातून सिमेंट बंधारे, माती बांध, नाला खोलीकरण, काँक्रिट रिचार्ज बंधारे, शेतातील कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, दुरुस्तीतील बंधारे तयार केले. यंदाही समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. 

८० लाख लिटर जलसाठा अडला
लोकवर्गणीसह जवाहर सामाजिक ट्रस्ट, नाम फाउंडेशन व मालेगाव येथील नेते डॉ. तुषार शेवाळे यांनी पोकलॅंड व जेसीबी मशिन उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे शेतशिवारातील चार किलोमीटर नाला खोलीकरण व सलग समतल चर तयार करण्यास मोठी मदत झाली. 
श्रमदानातून दहा हजार व यंत्राच्या साहाय्याने ५८ हजार घनमीटर खोलीकरणाचे काम केल्याने सहा कोटी ८० लाख लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणात जलसाठा अडविण्यास मदत झाली. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सर्वच बंधारे, नाले तुडुंब भरले असून भूजल पातळीत लाक्षणीय वाढ झाली आहे. या कामामुळे ग्रामस्थांसह शेतकरी सुखावले आहेत. लोकवर्गणी, श्रमदानातून व यंत्राच्या सहायाने केलेल्या बंधाऱ्यात, नाल्यात साठा पाहून वेगळेच समाधान लाभत आहे. लामकानीचे शेतशिवार नक्कीच दुष्काळमुक्त झाल्याचे दिसून येते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule jalkranti couponline flower