तर शेतातच आत्‍मदहन; शेतकऱ्याने दिला इशारा

एल. बी. चौधरी
Monday, 30 November 2020

संपादीत शेतीमुळे पीक कर्जही मिळत नाही. आता काय करावे या विवंचनेत शेतकरी आहेत. जामफळ प्रकल्पालगतच्या शेती व अंतर्गत विहीरी शासनाने ताब्यात घेतल्या. 

सोनगीर (धुळे) : तापी नदीच्या सुलवाडे येथून जलवाहिनीद्वारे जामफळ व कनोली प्रकल्प भरुन घेणारी योजनेतील बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला 15 दिवसांत न मिळाल्यास प्रकल्पासाठी शेती देणार नाही. बळजबरी केल्यास शेतातच आत्मदहन करू असा इशारा सोंडले (ता. शिंदखेडा) शिवारातील शेतकऱ्यांनी दिला आहे. 
दोन वर्षांपासून धरणाच्या कामामुळे शेतकऱ्यांनी शेतीत पेरणी न करता पडीक ठेवली. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदाचा रब्बी हंगामही वाया गेला आहे. संपादीत शेतीमुळे पीक कर्जही मिळत नाही. आता काय करावे या विवंचनेत शेतकरी आहेत. जामफळ प्रकल्पालगतच्या शेती व अंतर्गत विहीरी शासनाने ताब्यात घेतल्या. 

मोबदला कधी?
प्रकल्पात शेतजमीन गेल्याने शेतकऱ्यांची कायमस्वरूपी रोजगार बुडाला आहे. याचा मोबदला कधी ना कधी तरी मिळेलच पण आजच धरणग्रस्त शेतकऱ्यांना खायला काही नाही. नंतर कितीही पैसे मिळाला तरी उपयोग काय? अनेकांच्या मुला मुलींचे लग्न लांबले, तर काहींच्या शस्त्रक्रिया होवू शकल्या नाहीत. शेतीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्याने मोबदला मिळाल्यास भुमीहीन झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शेती घेऊन पोट भरता येईल. म्हणून त्वरीत मोबदला मिळावा; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

बाजारभार पेक्षा कमी दर
दरम्यान शेतीला व फळझाडांना बाजारभावाच्या चारपट दाम देण्याऐवजी उलट बाजारभावपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. लवकर व पुरेसा मोबदला न मिळाल्यास शेतीतर देणार नाहीतच; पण आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून आमच्या हक्काच्या शेतीचा मोबदला मिळत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चकरा मारून चपला झिजल्या. आम्हाला उलटसुलट सांगितले जाते. त्यामुळे आमची आर्थिकस्थिती व मनस्थिती खालावली आहे. शासन अजून एक धर्मा पाटील होण्याची वाट पाहात आहे का? 
- संजय परदेशी, शेतकरी, सोनगीर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule jamfad kanoli praklp water issue and farmer's warning of self-immolation