esakal | गृहमंत्र्यांना केले असे व्टिट की थेट वीस जणांवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

सहा महिन्यांपासून बहिष्कृत पाच कुटुंबांना गावाबाहेर काढल्याने आणि दोन महिने पोलिसांच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने मदत करावी, लक्ष घालावे, अशा आशयाचा "ट्‌विट' पीडित दीपक राठोड या तरुणाने सोमवारी (ता. 6) सकाळी सहाला गृहमंत्र्यांना केला.

गृहमंत्र्यांना केले असे व्टिट की थेट वीस जणांवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : खोरदड तांडा (ता. धुळे) येथे गेल्या वर्षी घडलेल्या विनयभंग प्रकरणी गुन्ह्यातील संशयिताला जामीन दिला म्हणून संशयितासह जामीन देणाऱ्या कुटुंबाला बंजारा समाज जातपंचायतीने बहिष्कृत केले. याप्रश्‍नी न्याय मिळत नसल्याने पीडित तरुणाने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांना "ट्‌विट' केले. त्याची दखल घेत त्यांनी पोलिस अधीक्षकांना कारवाईचा आदेश दिल्यावर जातपंचायतीच्या 20 जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

आवर्जून वाचा - रूग्णवाहिका आली घरी सोडायला...गाव येण्यापुर्वीच केला असा प्रकार


सहा महिन्यांपासून बहिष्कृत पाच कुटुंबांना गावाबाहेर काढल्याने आणि दोन महिने पोलिसांच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने मदत करावी, लक्ष घालावे, अशा आशयाचा "ट्‌विट' पीडित दीपक राठोड या तरुणाने सोमवारी (ता. 6) सकाळी सहाला गृहमंत्र्यांना केला. त्यावर गृहमंत्र्यांनी लागलीच घटनेची लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई करू, तुमच्या पाच कुटुंबांसह मुलांबद्दल मला सहानुभूती आहे, असा प्रत्युत्तरादाखल "ट्‌विट' गृहमंत्र्यांनी केला. तसेच त्यांनी लागलीच पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना कारवाईबाबत ईमेल केला. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासन हादरले व कामाला लागले. 

एकाच दिवसात कारवाई 
धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पथक चौकशीसाठी दुपारी चारला खोरदड तांड्यात पोचले. पीडित पाच कुटुंबे व बंजारा जातपंचायतीशी निगडित 20 जणांना पोलिस अधीक्षक कार्यालयात बोलविण्यात आले. त्यांची रात्री नऊपर्यंत पोलिस अधीक्षक पंडित यांनी स्वतः चौकशी केली. नंतर तालुक्‍याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना पंचायतीच्या 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार दीपक सोमा राठोड (वय 35, रा. खोरदड तांडा) यांच्या फिर्यादीनुसार बंजारा समाज जातपंचायत व गाव नायक मोहन भिला चव्हाण, जगदीश ताराचंद राठोड, गावकारभारी इंदल नरसिंग राठोड, विजय प्रल्हाद जाधव, मिठाराम बुधा जाधव, अमरसिंग विजय जाधव, अंजनाबाई देवचंद राठोड, यशोदाबाई भावडू राठोड, छबलीबाई तारासिंग राठोड, बायकीबाई बन्सी राठोड, बजाबाई हरलाल पवार, वसंत नरसिंग राठोड, उदल भावडू राठोड, देवकीबाई भारमल राठोड, राजेंद्र नरसिंग राठोड, कैलास दलीचंद राठोड, रणजित मिठाराम राठोड, दिनकर हिरामण जाधव, यशवंत देवचंद राठोड, सोपान बन्सी राठोड (सर्व रा. खोरदड तांडा) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये मंगळवारी (ता. 7) पहाटे गुन्हा दाखल झाला. 

पीडित कुटुंबाची कैफियत 
गेल्या वर्षी धुळे तालुका पोलिस ठाण्यात गावातील विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी समाजातील संशयिताला फिर्यादी दीपक राठोड याच्या वडिलांनी जामीन दिला होता. त्यामुळे फिर्यादीसह दिलीप बारकू राठोड, सुनील वसंत पवार, सुनीता चंद्रकांत राठोड, सलतान प्रताप चव्हाण यांना वीस जणांनी संगनमत करत बंजारा समाजातून बहिष्कृत केले. त्यामुळे पीडित कुटुंब शेतात राहात होते. त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरू न देणे, गावात किराणा, औषधे, खरेदी करू न देणे, पिठाच्या गिरणीवर येऊ न देणे, लग्न, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधीला हजर राहू न देणे, मुला- मुलींचे लग्न जमू न देणे, पीडित कुटुंबाला खोरदड तांड्यातील त्यांच्या घरांमध्ये राहू न देणे आदी प्रकारे जातपंचायतीच्या पंचांनी जाच दिल्याची व्यथा तक्रारदार राठोड यांनी मांडली "अंनिस'कडे मांडली होती. या प्रकरणी "अंनिस'चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, जातपंचायतीला मूठमाती अभियान प्रमुख कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुरेश बिऱ्हाडे, जिल्हा सचिव प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, कायदेशीर सल्लागार ऍड. विनोद बोरसे यांनी पाठपुरावा केला.