esakal | "जवाहर'मध्ये प्रसूतीसह सर्वच शस्त्रक्रिया निःशुल्क 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule javahar hospital

प्रसूती, सीझर, संततीनियमनासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील, अशी माहिती संचालक मंडळाने दिली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. 

"जवाहर'मध्ये प्रसूतीसह सर्वच शस्त्रक्रिया निःशुल्क 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : "लॉकडाउन'च्या परिस्थितीतही जिल्ह्यातील रुग्णांचे हाल होऊ नयेत, यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या "एसीपीएम' मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल पूर्णक्षमतेने आरोग्यसेवा देत आहे. सर्वच प्रकारच्या रुग्णांवर नाममात्र दरात येथे उपचार होत आहेत. आता प्रसूती, सीझर, संततीनियमनासह सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील, अशी माहिती संचालक मंडळाने दिली. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन फाउंडेशनने केले आहे. 

रुग्णांवर नाममात्र दरात उपचार 
जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी जवाहर मेडिकल फाउंडेशनतर्फे प्रयत्न होत आहेत. 550 बेडच्या विस्तीर्ण हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर नाममात्र दरात उपचार केले जातात. फाउंडेशनमध्ये प्रसूती, सीझर, जनरल शस्त्रक्रिया, संततिनियमन, हाडांच्या शस्त्रक्रिया, मूतखड्याचे विकार, मूत्रविकार, दातांशी निगडित आदी सर्वच शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. त्यासाठी रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी एक रुपयाही खर्च येणार नाही. दरम्यान, महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष योजनेत बसणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेबरोबर, औषधी, जेवण, उपचार आदी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. 

सामाजिक बांधिलकीतून सेवा 
उपचारांसाठी मोठा खर्च होत असताना जवाहर मेडिकल फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत आरोग्य सेवेचे व्रत जोपासले आहे. निष्णात डॉक्‍टरांकडून शस्त्रक्रियेबरोबरच विविध उपचार याठिकाणी केले जात आहेत. तरी या सर्व मोफत शस्त्रक्रियांचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदींनी केले आहे. 

पाच रुपयांत शिवभोजन योजना 
अनेक रुग्णांचे जेवणाविना हाल होतात. त्यामुळे जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व रुग्णालयात रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाइकांना केवळ पाच रुपयांत शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिलेली आहे. दररोज 200 थाळ्यांचा लाभ गरजूंना होत आहे. रुग्णालयाच्या आवारातच त्यासाठी व्यवस्था केलेली आहे. 

सर्वच शासकीय योजना लागू 
रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, आयुष योजना, प्रसूत होणाऱ्या महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदन योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, महापालिकेच्या क्षेत्रातील महिलांना मोफत यूएसजी सुविधा प्रदान केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना या योजनांचा लाभ मिळत आहे. 

loading image