जम्बो क्लिनिकचा प्रस्ताव सादर करा 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 August 2020

महापालिका, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी बैठकीत निश्चित केल्याप्रमाणे ऑक्सिजन बेड तयार करण्याची कार्यवाही पुढील तीन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा. शिवाय ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे होईल याची दक्षता घ्यावी.

धुळे : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. या स्थितीत रुग्णांची तपासणी करण्यासाठी महापालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने समन्वयातून जम्बो क्लिनिकचा प्रस्ताव सादर करावा. तसेच रुग्ण व्यवस्थापनाबाबत टास्क फोर्सच्या बैठकीत निर्णय घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी गुरुवारी (ता. ३०) दिले. 

जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या तीन हजारांपुढे गेली आहे. या पार्श्वभूमीवर आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी यादव अध्यक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, सुरेखा चव्हाण, श्रीकुमार चिंचकर, प्रांताधिकारी भीमराज दराडे, डॉ. विक्रम बांदल, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, उपायुक्त गणेश गिरी, टास्क फोर्स समितीचे सदस्य डॉ. अरुण मोरे, डॉ. राजेश सुभेदार आदी उपस्थित होते. 

ऑक्सिजन बेडची तयारी 
महापालिका, जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी बैठकीत निश्चित केल्याप्रमाणे ऑक्सिजन बेड तयार करण्याची कार्यवाही पुढील तीन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करावा. शिवाय ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे होईल याची दक्षता घ्यावी. रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढवावी. त्यासाठी आवश्यक किटची खरेदी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. आरोग्य यंत्रणांच्या कामाची पुढील तीन दिवसांत पाहणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. त्यांनी कोविड केअर सेंटर येथील पोलिस बंदोबस्त, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सीसीटीव्ही, कोरोनाबाधित रुग्णांचे समुपदेशन आदींचा आढावा घेतला. 

कठोर अंमलबजावणी करा 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंन्टेन्मेंट झोनची कठोरपणे अंमलबजावणी करा. गर्दीवर नियंत्रण आणावे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मदत घेत कंन्टेन्मेंट झोनची परिणामकारक अंमलबजावणी करावी. विनामास्क किंवा विनाकारण गर्दी करणाऱ्यांवरही कारवाई करावी. पोलिसांची मदत घ्यावी. नागरिकांनी सहकार्य केले नाही, तर नाइलाजास्तव लॉकडाउनचा विचार करावा लागेल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule jumbo clinic Proposal collector yadav health department