पर्यंटणासाठी पर्यटकांना खुणावतोय काळगावचा धबधबा

दगाजी देवरे  
Saturday, 22 August 2020

खळखळून वाहने नाले व शेतशिवारापासून दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर हा धबधबा दिसतो. राहूड(ता. सटाणा)गावाच्या सीमेवरून हा धबधबा खाली कोसळतो. 

म्हसदी  : कधी रिमझिम, तर कधी मुसळधार सरी अन् मनसोक्त कोसळणारे लहान मोठे तीन धबधबे अशा निसर्गाचे देणे लाभलेल्या काळगाव(ता. साक्री) येथील जुनागाव वनक्षेत्राचा परिसर हिरावाईने नटला आहे. हजारो फूट उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा आनंद स्थानिक पर्यटक मनमुरादपणे घेत आहेत. हे ठिकाण पर्यटनस्थळ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

म्हसदीपासून सात किलोमीटर नामपूर रस्त्यावर काळगाव जुनागाव वनक्षेत्र आहे. निसर्गरम्य वनक्षेत्रातील धबधबा अनेकांना भुरळ घालत आहे. वनविभाग व स्थानिकांच्या माहितीनुसार हजारो फुटांवरून हा धबधबा कोसळतो. खळखळून वाहने नाले व शेतशिवारापासून दोन किलोमीटर अंतर पार केल्यावर हा धबधबा दिसतो. राहूड(ता. सटाणा)गावाच्या सीमेवरून हा धबधबा खाली कोसळतो. 

गाव झाले पाणीदार! 
गेल्या दोन वर्षापूर्वी दुष्काळाशी सामना करताना ग्रामस्थांनी शासनाच्या विविध विभागाच्या सहकार्याने एकजुटीतून श्रमदान करत वनक्षेत्रात ३२ ठिकाणी बंधारे बांधले. त्यासाठी अपार मेहनतही घेतली. यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे या मेहनतीचे चीज झाले अन् काळगाव येथील वनक्षेत्रातील सर्वच लहान-मोठे बंधारे तुडूंब भरून वाहत आहेत. पावसाच्या पाण्याचा वाहून जाणारा थेंब अन् थेंब अडविला गेल्याने काळगाव पाणीदार झाले आहे. 

पायवाटेने रस्ता... 
शेतशिवारातून धबधब्याकडे जाण्यासाठी वनक्षेत्रातून दीड किलोमीटर अंतर पायवाटेने जावे लागते. पर्यटकांची गर्दी लक्षात घेत ग्रामपंचायत आणि वन व्यवस्थापन समितीने पायवाट तात्पुरती दुरुस्त केली आहे. या ठिकाणी रस्ता झाला तरी धबधब्याकडे आकर्षित होणारी गर्दी हमखास वाढणार आहे. यासाठी शासकीय पाठबळ मिळावे अशी अपेक्षा वन व्यवस्थापन समितीने उपाध्यक्ष पठाण सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. एक हजार ९३ लोकसंख्या व दोनशे कुटुंबाचे वास्तव्य असलेले गाव काळगाव. १३२९हेक्टर वनक्षेत्र असून महसूल क्षेत्र चारशे तीस हेक्टर आहे. मोठ्या वनक्षेत्राचा फायदा इतर लघु उद्योगांना होऊ शकतो. वनक्षेत्रात अनेक दुर्मीळ वनभाज्या आहेत. वनविभागाने चालना दिल्यास मोठा बदल घडू शकतो. 

काळगाव परिसरात नैसर्गिक संपती सहज उपलब्ध होणार आहे. स्थानिक ठिकाणी मदत मिळू शकते. शासनाने पाठबळ दिल्यास केवळ वनसंपदेवर अनेकांना रोजगार मिळू शकतो. शिवाय चराईबंदी, कु-हाड बंदीस बळ मिळणार आहे. 
-संजय निंबा भामरे, सरपंच तथा अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, काळगाव 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

धुळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule kalagava water foll attracting tourists for tourism